हरभरा बियाण्यावर कृषी विभागाकडून मिळणार भरघोस अनुदान, ‘या’ तारखेपर्यंतच मिळणार लाभ

किसानवाणी : राज्यात रब्बी हंगामात हरभरा पिकाखालील लागवड क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने 38 कोटी रुपयांची अनुदानित बियाणे वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याला पाच एकर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा बियाण्यावर प्रतिक्विंटल २५०० रुपये अनुदान दिले जात आहे.

रब्बी हंगामातील बियाणे वाटपाच्या नियोजनाचा आढावा कृषी मंत्री दादा भुसे यांनी घेतला. कृषी विभागाकडून वाटल्या जाणाऱ्या हरभरा बियाणे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,यामुळे हरभऱ्याचे उत्पादन व उत्पादकतावाढण्यास मदत होईल असे कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले.

या मोहिमेची सुरुवात राष्‍ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून सोमवार १८ ऑक्टोबर पासून राज्यभर सुरू झाली. ही मोहीम २४ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या वेळेस भरपूर पाऊस झाल्यामुळे हरभरा पिकासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत आहे. हरभरा पिकासाठी चांगली स्थिती असल्याने यावर्षी हरभरा लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

 यावर्षी रब्बी हंगामात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात दर्जेदार हरभऱ्याचे बियाणे मिळवून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.