पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

किसानवाणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रूपये देण्यात येतात. वर्षभरात तीन हप्त्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केले जातात. परंतु या योजनेत अनेक अपात्र लोकांनी लाभ घेतल्याचे ध्यानात आल्यानंतर केंद्र शासनाने ही बाब गांभिर्याने घेत नोंदणीची प्रक्रियाच बदलली आहे.

योजनेतील गैरप्रकार निदर्शनास आल्यानंतर शासनाने या योजनेसाठीची नोंदणी काही कालावधीसाठी बंद केली. त्यानंतर आता तालुक्यातील प्रत्येक तहसीलदाराला लॉगिन आयडी देण्यात येणार असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी तहसील कार्यालयात केली जाणार आहे. यापूर्वी योजनेची नोंदणी करण्यासाठी खाजगी ऑनलाईन सेंटर्सना परवानगी देण्यात आली होती. परंतु याच माध्यमातून मोठे गैरव्यवहार होत असल्याची प्रकरणे समोर आल्याने नोंदणीची प्रक्रिया बदलण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

सध्या अपात्र असलेल्या शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून वसूलीचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती खरेदी केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील हिस्से वाटणी झाली आहे, अशा शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायची आहे. परंतु शासनाने गेले दोन महिने नोंदणीच बंद केल्याने नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे आता प्रत्यक्षात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी कधी नोंदणी सुरु होते याकडे शेतकऱ्यांचे  लक्ष लागले आहे.