Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsमोदी सरकारला शेतकऱ्यांनी झुकवलं; तिन्ही कृषि कायदे रद्द

मोदी सरकारला शेतकऱ्यांनी झुकवलं; तिन्ही कृषि कायदे रद्द

किसानवाणी : शेतकऱ्यांच्या पुढे शरणागती पत्करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर तिन्ही कृषि कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. मोदी यांनी शुक्रवारी गुरूनानक जयंती प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले आणि यादरम्यान ही मोठी घोषणा करत सुधारित कृषी कायदे मागे घेत असल्याचे सांगितले.

तीनही सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा

पीएम मोदी म्हणाले की, ‘आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुधारित कृषी कायदे आणले होते. पण आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.’

मोदी म्हणाले की, ‘कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द ( Repeal)करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.

गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच आता आंदोलनकर्त्यांनी आंदोलन परत घ्यावे. असं आवाहनही नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

संसदेत कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही : राकेश टिकैत

यावर प्रतिक्रिया देताना, आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी म्हणटले आहे की, आंदोलन आताच मागे घेतले जाणार नाही. ट्वीट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढं अखेर सरकारला झुकावं लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तरीही आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असं राकेश टिकैत म्हणाले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments