Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsकांदा निर्यातीतील घट का ठरतेय महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या पुढील बाजाराची...

कांदा निर्यातीतील घट का ठरतेय महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या पुढील बाजाराची दिशा

किसानवाणी : उन्हाळी कांद्याच्या लागणी आता वेग धरत आहेत. शेवटच्या टप्प्यातील शिल्लकीतील उन्हाळ कांदा आता बाजारात येत आहे. दुसरीकडे नव्या लाल कांद्याच्या दबाव सुध्दा मार्केटवर दिसत आहे. यंदा जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात ज्यांनी टप्प्या टप्प्याने ९० टक्के पेक्षा जास्त कांदा विकला असेल, त्यांचा सरासरी विक्री दर चांगला असेल. पंरतु ज्यांनी दिवाळीनंतर ३० टक्के कांदा होल्ड केला त्यांचा सरासरी विक्री दर कमी येईल असे दिसत आहे. पुढे डिसेंबर महिन्यात पाऊसमान आणि शिल्लक कांदा किती राहतो, आणि नव्या मालाची आवक नेमकी किती येईल, या परिस्थितीवर बाजारभावाचे गणित अवलंबून असेल. 

दिवाळीनंतर बाजारभाव किफायती न राहण्यामागे, घटती निर्यात हे प्रमुख कारण पुढे आले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते स्पटेंबर दरम्यानची निर्यातीची आकडेवारी अपेडा कडून उपलब्ध झाली आहे. त्यानुसार ९ लाख टन कांदा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान निर्यात झालेला आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबरच्या तुलनेत कांदा निर्यातीत ३१ टक्यांची घट दिसत आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान १३ लाख टन कांदा निर्यात झाला होता. त्यामुळे ४ लाख टनानी निर्यात घटने हे थोडे निराशाजनक आहे. 

ही निर्यात का घटली असावी या बाबत निर्यातदारांचे असे म्हणणे आहे की,  गेली दोन वर्षे सातत्याने निर्यात बंदी होत अाहे. आणि त्याचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. जिथे बांगलादेशात दररोज २०० गाडी माल जायचा आज ५ ते १० गाड्यांवर हा व्यवहार येऊन ठेपलाय. याचे प्रमुख कारण जाणून घेतले असता म्यानमारचा कांदा बांगलादेशात आयात केला जात आहे. त्यामुळे भारतीय कांद्यास मागणी कमी आहे. याचाच अर्थ येत्या काळात निर्यातबंदी करणे कोणत्याही परिस्थितीत देशाला परवडणारे नाही. 

गेल्या वर्षी बांगलादेशच्या पंतप्रधानांनी निर्यात सुरू ठेवा अशी विनंती करत होते, तरीही भारताने निर्यात बंदी सुरू ठेवली. कुठल्याही देशाला व्यापारात सातत्य हवे असते. विश्वास हवा असतो, त्यामुळेच निर्यातीतल्या धरसोडीमुळे भारताने हा विश्वास गमावलेला आहे. अशा परिस्थितीत कुठलाही देश दिर्घकाळाच्या आयातीच्या विचार करताना भारतावर विसंबून राहणार नाही. आणि सहाजिकच दुसरे पर्याय शोधेल. त्यामुळे म्यानमार मधून बांगलादेशला होत असलेला कांदा पुरवठा हे त्याचे सुचक आहे. 

निर्यात घटण्यामागणी अन्य महत्वाची कारणे

 1. श्रीलंकेतील आर्थिक पेचप्रसंगामुळे श्रीलंकन रूपयाचा घटत्या दराचा फटका भारतीय निर्यातदारांना बसला. कोट्यावधींचा फटका बसल्याने व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
 2. कंटेनर (वाहतूक) भाडेवाढ हे देखील एक महत्वाचे कारण आहे. आग्नेय आशियातील व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या तसेच आखाती देशांना जो काही कांदा कंटेनरनी निर्यात होतोय, त्यासाठी कंटेनरची भाडेवाढ झाली. कंटेनरच्या भाववाढीमागे जागतिक बाजारातील तेलाची दरवाढ हे प्रमुख कारण आहे. एकूणच कांदा व्यापारावर याचा प्रतिकूल परिणाम झाला. 
 3. पाकिस्तानशी स्पर्धा हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तीनी कांद्याला जास्त पडतळ आणि पॅरिटी मिळत होती. त्यामुळे तो कांदा स्वस्त होता. भारतीय कांदा या काळात डिसपॅरिटीत असल्याने तो महाग होता, परिणामी त्याचा निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला.

महाराष्ट्राच्या दृष्टीने कांदा निर्यातीचे महत्व

 1. यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातून झालेल्या ९ लाख टन कांदा निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा ४ लाख ६ हजार टन इतका आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगाल मधून जवळपास सव्वातीन लाख टन कांदा निर्यात झाली आहे. तर ७५ हजार टन कांदा तामिळनाडूतून निर्यात झाला आहे.
 2. महाराष्ट्रातून पश्चिम बंगाल मध्ये देशांतर्गत कांदा वाहतूक होते. त्यामुळे पश्चिम बंगालच्या नावे होणारी बरिचशी कांदा निर्यात महाराष्ट्राच्याच हिश्याची असण्याचा अंदाज आहे. 
 3. संपूर्ण वर्षाचे चित्र पाहता, गेल्या वर्षाची आकडेवारी आपल्याला चांगली दिशा देईल. गेल्या आर्थिक वर्षात देशातून १५ लाख ७५ हजार टन कांदा निर्यात झाला होता. आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा ८ लाख टन अर्थात ५० टक्यापेक्षा अधिक होता. २८०० कोटींच्या परकिय चलनात महाराष्ट्राचा वाटा १५०० कोटींचा होता. त्यामुळे महाराष्ट्रतील कांद्याची एकूण अर्थव्यवस्था ही निर्यात केंद्रीत आहे
 4. महाराष्ट्रातील कांदा उत्पादनाला, निर्यातीचा आधार मिळण्यासाठी सर्वच पातळ्यावर काम करावे लागणार आहे.   

निर्यात योग्य रब्बी कांद्याकडे झुकता कल

 1. गेल्या वर्षी देशात साडे दहा लाख हेक्टरवर रब्बी कांद्याचा पेरा झाला होता. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४ लाख हेक्टर होता. यंदा देशातील एकूण उन्हाळ कांदा आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा, या दोन्ही बाबतीत वाढ दिसणार आहे. फेब्रुवारीच्या अखेर पेरणीविषयी अंतिम आकडेवारी येईल, त्यावेळी यावर शिक्कामोर्तब झालेले दिसेल.
 2. उन्हाळी हंगामात जास्त करून शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे असते, त्यामुळे कंपन्यांकडील बियाणे विक्रीवरून कांदा लागवडीच्या क्षेत्राचा अंदाज लावणे कठीण आहे. 
 3. सलग तीन वर्षे पावसाळी हंगाम फेल गेल्याने, उन्हाळी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. यंदा जर ११ लाख हेक्टरवर रब्बी/उन्हाळी पेरा झाला तर, आणि राष्ट्रीय हेक्टरी २० टन कांदा उत्पादन मानता २२० लाख टन उत्पादन मिळू शकेल.
 4. पूर्वी पावसाळी कांदा ४० टक्के तर उन्हाळी कांदा ६० टक्के असे प्रमाण असायचे. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण पावसाळी २५ टक्के तर उन्हाळी ७५ टक्के असे झाले आहे. 
 5. जर पावसाळी कांदा सरासरी इतका पिकला, तर देशात गरजेपेक्षा कांद्याचा जास्त पुरवठा होतो. मात्र गेल्या ३ वर्षापासून पावसाळी कांद्याचे प्रमाण घटण्याबरोबर साठवणीतील उन्हाळी कांद्यात देखील जास्तीची घट होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम सलग ३ वर्षे कांद्याला किफायती बाजारभाव मिळाला आहे. त्यामुळे नव्या हंगामात नैसर्गिक परिस्थिती कशी राहते, पुढच्या वर्षी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 

मध्यप्रदेशातून वाढती स्पर्धा

 1. मध्यप्रदेशात मागील वर्षी जवळपास पावणे दोन लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागण झाली होती. म्हणजेच संपूर्ण नाशिक जिल्ह्या इतकी कांदा लागण आता मध्यप्रदेशात होत असल्याचे दिसत आहे.
 2. कांदाचा स्ट़ॉक करण्यामध्येही महाराष्ट्रा पाठोपाठ मध्यप्रदेश आघाडीवर आहे. 
 3. महाराष्ट्राच्या कांदा शेतीच्या नियोजनात खरीपात दक्षिणेकडील राज्ये तर लेट खरीपात राजस्थान अाणि उन्हाळ हंगामात मध्यप्रदेशातील पिक परिस्थीतीचा विचार करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे. 
 4. महाराष्ट्रात पूर्व विदर्भ व कोकण वगळले तर सर्वत्र कांदा पिक घेतले जात आहे, त्यामुळे पारंपारिक उत्पादन विभागातील मालास जर उठाव मिळवून द्यायचा असेल तर निर्यातीला पाळबळ मिळाले पाहिजे, आणि तशी धोरणे राबविण्यासाठी कांदा उत्पादन विभागातून दबाव गट वाढणे गरजेचे आहे. 
 • दीपक चव्हाण, शेतमाल बाजार अभ्यासक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments