एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन; आंदोलनात सहभागी होण्यासाठी फक्त ‘इतकंच’ करा

#एकरकमी_FRP

किसानवाणी : ऊस उत्पादकांना तुकड्या तुकड्यात दिल्या जाणाऱ्या एफआरपीला विरोध करण्यासाठी, होय आम्ही शेतकरी समूहामार्फत डिजिटल आंदोलन छेडण्यात आलयं. शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेला #एकरकमी_frp हा हॅशटॅग करून फेसबुक, ट्विटर, इंस्टावर आपले म्हणणे पोस्ट करायचे आहे. जेणेकरून आपल्या मनातील आक्रोश सरकारपर्यंत मांडला जाईल.

यंदा उसाची FRP विविध टप्प्यात दिली जावी यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार देखील प्रयत्नशील आहे. राज्यसरकारने देखील उसाची FRP ३ टप्प्यात (६०+२०+२०) देण्यात यावी अशी केंद्र सरकारकडे शिफारस केल्याची माहिती आहे. केंद्रात भाजपचे सरकार असताना निदान महाराष्ट्र सरकार तरी या निर्णयाचा विरोध करेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. परंतु सध्या तसे काहीच झालेले दिसत नाही.

टप्प्याटप्याने एफआरपीचा विचार केला तर, पहिला हफ्ता ६०% मिळाला तर शेतकऱ्यांना १६०० ते १७०० रूपयाच्या आसपास पहिला हप्ता मिळेल. जो सोसायटी आणि इतर बॅंकांचे पीक कर्ज भागवण्यास देखील अपुरा आहे. पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती असताना मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थितीचा विचारच करायला नको. दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची स्थिती याहून गंभीर असेल. सध्या काही कारखाने एकच हफ्ता देत आहेत. यामुळे त्यांनाही टप्प्या टप्प्यात एफआरपी देण्यासाठी आयतीचं संधी मिळेल.

आज सगळ्या पिकांचा विचार केला तर ऊस पूर्णतः उधारीवर कारखान्याला दिले जाणारे एकमेव पीक आहे. याचे पैसे कधी मिळतील आणि किती मिळतील याचीही खात्री शेतकऱ्यांना नसते. बाकीच्या पिकांबाबतीत निदान काहीतरी भाव शेतकऱ्याला तात्काळ मिळतो. पण ऊस हा पूर्णतः उधारच द्यावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या अ़डचणीत नेहमीच भर पडते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आताच जागे होण्याची गरज आहे, अन्यथा आयुष्यभर साखर कारखानदारांचे गुलाम म्हणूनच रहावे लागेल.

ऊस उत्पादकांना निर्माण होणारी ही समस्या ध्यानात घेऊन होय आम्ही शेतकरी समूहामार्फत डिजिटल आंदोलन छेडण्यात आलं असून शनिवार दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेला #एकरकमी_frp हा हॅशटॅग करून फेसबुक, ट्विटर, इंस्टावर आपले म्हणणे पोस्ट करायच्या आहेत. जेणेकरून आपल्या मनातील आक्रोश सरकारपर्यंत मांडला जाईल. तरी सर्व शेतकरी मित्रांनी होय आम्ही शेतकरी समूहामार्फत राबवण्यात येणाऱ्या या डिजीटल आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन समुहाचे प्रबंधक डॉ. अंकुश चोरमुले यांनी केलं आहे.
आष्टा, सांगली