सोयाबीनचे दर वाढले म्हणून घाईने विक्री करू नका, कारण…

किसानवाणी : बाजारात सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्यानंतरही आवक कमीच होत आहे. देशभरातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनने ६२०० ते ६७०० रूपयांची पातळी गाठलीय. त्यापाठोपाठ सोयापेंडीचे दरही ५७०० ते ६२०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहचले आहेत. सोयाबीन दरात अशीच वाढ होत राहिली आणि सोयापेंडीने ७००० रूपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला तर सरकारच्या हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास आणि सरकारच्या धोरणांकडे लक्ष ठेवून सोयाबीन विक्रीचा निर्णय घ्यावा असे आवाहन जाणकारांकडून व्यक्त होतय.

सोयाबीन बाजाराने दिवाळीनंतर यंदाच्या हंगामातील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर घटही अनुभवली. सोयाबीनच्या दरात मागच्या ६ दिवसांमध्ये सुधारणा दिसून आलीय. सोयाबीनचे दर सध्या पूर्व पातळीवर आल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र बाजारात सुधारणा होऊऩही आवक कमीच आहे. एरवी बाजारात सोयाबीनची दैनंदिन आवक ५ ते ६ लाख पोती होत असते, मात्र यंदा ३ ते ३.५ लाख पोती होत आहे. त्यामुळे दर पडले तरी शेतकरी विचारपूर्वक विक्री करत आहेत. तर दर वाढल्यानंतरही सोयाबीन आवक होत नसल्याने उद्योगाना सोयाबीनसाठी धावाधाव करावी लागत आहे.

वाढत्या सोयापेंड दरांमुळेही बाजाराचा आढावा घेऊन विचार पूर्वक विक्री आवश्यक आहे. कारण सोयाबीनचे दर आणखी जास्त वाढले आणि सोयापेंडीने ७० हजार प्रती टनाचा टप्पा गाठला तर सरकारचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दर वाढत असले तरी सजग राहून सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे.

नांदेड येथील सोयाबीनचे व्यापारी भास्कर शिंदे यांच्या मते दर वाढले तरी आवक कमीच आहे. बाजारात सोयाबीनसह सोयापेंडीच्या दरातही वाढ होत आहे, त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप नाकारता येत नाही. त्याची प्रतिक्रिया बाजारात उमटेल.

आंतराष्ट्रीय बाजारात ही सोयाबीन दरात चढ उतार सूरू आहेत. सोमवारच्या सौद्यात चीनकडून खरेदी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजाराला आधार मिळाला आहे. मागच्या काही दिवसात चीन ब्राझील कडून सोयाबीनची खरेदी करत होता. परंतु आता अमेरिकेच्या सोयाबीनचीही चीनने खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात सुधारणा पहायला मिळाली.

सोमवारी सीबॉट वर सोयाबीन सौदे १२.६७ डॉलर प्रति बुशेसने झाले आहेत. २४ नोव्हेंबर नंतर हे दर सर्वाधिक होते. सोयाबीन १२.२५ डॉलरवर आल्यानंतर पुन्हा वाढीकडे निघाला आहे. त्यामुळे येत्या काळात याचा परिणाम भारतीय बाजारावर ही होणार असून शेतकऱ्यांनी सजगतेने सोयाबीनची विक्री करणे फायदेशीर राहणार आहे.