पुणे येथील ‘या’ कंपनीकडून परदेशात होतेय चक्क गांडूळाची निर्यात; गांडूळ उत्पादकांसाठी मोठी संधी

किसानवाणी : भारतातून केवळ अन्नधान्यच निर्यात होते असे नाही, तर चक्क जिवंत गांडूळांचीही निर्यात करण्यात आलीय. सेंद्रिय शेतीत महत्वाची भूमिका पाडणाऱ्या गांडूळाला थेट ओमान देशातून मागणी आली आणि पुण्यातील नेचर ॲग्रोटेक या कंपनीने त्याची यशस्वीरित्या निर्यातही केली. देशातून प्रथमच ६ हजार किलो गांडुळांची निर्यात झाली आहे. जगभरातील मृदा आरोग्य संपन्नतेचा अभाव असणाऱ्या देशांकरिता सेंद्रिय खत उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भारतासाठी ही मोठी संधी मानली जात आहे.  

जगभरात सेंद्रीय शेतीचे महत्व वाढताना दिसत आहे. त्यामुळे जगभरातील ग्राहक सेंद्रिय उत्पादनांची मागणी करत आहेत. या ग्राहकांना भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण सेंद्रिय उत्पादनांपैकी २५ टक्के मालाची निर्यात होत आहे. अशातच नवनव्या संकल्पना आणि गरजांतून निर्माण होणाऱ्या व्यवसायांना वाव मिळू लागल्याने अनेक प्रकारच्या निर्यात संधीही उपलब्ध होत आहेत. 

पुणे येथील नेचर ॲग्रोटेक या संस्थेला ई-कॉमर्सच्या व्यासपीठावरून अशीच एक गांडूळ कल्चर निर्यातीची संधी उपलब्ध झाली. त्यांनी नफा-तोटा, जोखीम यांचा मेळ घालत चार हजार किलो गांडुळांची यशस्वीरित्या ओमानला निर्यात केली आहे.

‘‘ई-कॉमर्सच्या व्यासपीठावरून गांडुळांची मागणी आमच्याकडे सप्टेंबरमध्ये नोंदविण्यात आली. देशांतर्गत गांडूळ पुरवठा करण्याचा आमचा अनुभव आहे. मात्र परदेशात गांडूळ आणि तेही जिवंत निर्यात करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. देशातूनही यापूर्वी कधीही गांडूळनिर्मिती न झाल्यामुळे सर्व प्रक्रिया नव्याने राबविण्याची वेळ आमच्यावर होती. याकरिता पुणे, मुंबई, औरंगाबाद, दिल्ली आदी ठिकाणी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कस्टम विभाग यांच्याशी प्रत्यक्ष भेट आणि संपर्क करण्यात आला. वीसएक दिवसांच्या धावपळीनंतर सर्व आवश्‍यक प्रमाणपत्र, परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता केली आणि २७ ऑक्टोबरला ओमान येथील सोहार बंदरात कंटनेर सुखरूप पोहोचला तेव्हाच हायसे वाटले.’’

गांडूळ पाठविण्याचा अनुभव कोणत्याही शिपिंग कंपनीला नव्हता. क्वारंटाइनसह माल व्यवस्थित पोहोचविण्याची जोखीम होती. याकरिता काही कंपन्यांना विषय समजावण्यात आला. सरकारच्या परवानग्या दाखविण्यात आल्या. अखेर बरेच प्रयत्न केल्यानंतर एका कंपनीने बुकिंग दिले आणि निर्यात पूर्ण केली. ‘‘आर्डर मोठी होती. माझे गांडूळ शेड आहेत, मात्र एकट्याला ऑर्डर पूर्ण करणे शक्य नव्हते. माळीवाडगाव (जि. औरंगाबाद) येथील शेतकरी गोरखनाथ गोरे यांची आर्डरची पूर्तता करण्यास मोठी मदत झाली. प्राथमिक पातळीवर गांडूळनिर्मिती आणि उपलब्धतेचा प्रश्‍न मिटला असला, तरी निर्यातीकरिता एकूण २० दिवसांचा कालावधी आवश्यक होता. पॅकिगमधून गांडुळे बाहेर न निघणे, त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळणे, याकरिता शास्त्रशुद्ध पॅकिंग करणे, या कालावधीत लागणारे खाद्य असणे, योग्य तापमान या सर्व बाबींची व्यावसायिक पातळीवर योग्य व्यवस्थापन करण्यात आले. पहिलाच प्रयत्न असल्याने गांडुळे २० दिवसांनंतर जिवंत ओमानपर्यंत पोहोचण्याबाबत धाकधूक होती, मात्र जेव्हा आयातदार कंपनीकडून उद्दिष्टपूर्तीचे कळविण्यात आले, तेव्हाच स्वप्नपूर्तीचे समाधान वाटले.’’

अमरनाथ अंदुरे,
संचालक, नेचर ॲग्रोटेक
www.natureagrotech.com

देशातून गांडूळ निर्यातीकरिता कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कस्टम विभाग, शिपिंग कंपनी आदींचे सहकार्य लाभले. विशेषत: कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे, संदीप आहेर, शिपिंग कंपनीचे अजय थाम्पी, स्वाती मानसिंग यांनी मार्गदर्शन आणि मदत केली.