अखेर सरकार नरमले.. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन, आता शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी!

किसानवाणी :
 कृषि कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणात सुरू असलेल्या उग्र आंदोलनानंतर केंद्र सरकार पहिल्यांदाच नरमले आहे. केंद्र सरकारने  आता नरमाईची भूमिका घेत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. यासंदर्भात आम्ही शेतकऱ्यांशी 3 डिसेंबरला चर्चा करु, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. 

नवे कृषी कायदे ही काळाची गरज आहे. आगामी काळात त्यामुळे क्रांतिकारी बदल पाहायला मिळतील. या कायद्यांविषयी असणारे शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही पंजाबमध्ये सचिव स्तरावर चर्चाही केली आहे. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आंदोलन करु नये. आम्ही या समस्येवर चर्चा करुन मार्ग काढण्यास तयार आहोत. या चर्चेतून काहीतरी सकारात्मक तोडगा निघेल, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हणटले आहे.

मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकांना कडाडून विरोध केला होता. मात्र, भाजपने प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांची मदत घेत विधेयके मंजूर करवून घेण्यात यश मिळवले होते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले होते.

मात्र, यानंतर अनेक बिगरभाजप राज्यांनी केंद्र सरकारच्या या कृषी कायद्यांविरोधात ठाम भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले आहे. कोणत्याही परिस्थितीत हे कायदे राज्यांमध्ये लागू होऊ देणार नसल्याचा पवित्रा अनेक राज्यांनी घेतला. याचे सर्वाधिक पडसाद पंजाब आणि हरियाणात उमटले आहेत. पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलन सुरु केले असून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणा सीमा सील करण्यात आली असून २६ आणि २७ नोव्हेंबरला सीमा बंद राहणार आहे.

यापूर्वीही नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांना दिल्लीत चर्चा करण्यासाठी बोलवले होते. त्यावेळी केवळ कृषी कायद्यांना पाठिंबा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाचीच कृषीमंत्र्यांनी भेट घेतली होती. तर या कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणे कृषीमंत्र्यांनी टाळले होते. या बैठकीला केवळ सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे बराच गदारोळही निर्माण झाला होता.