शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यानांबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय – कृषीमंत्री दादाजी भुसे

किसानवाणी : 
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार यापुढे शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्याना केंद्रस्थानी ठेवून विविध कृषी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले. जागतिक मृदा दिनानिमित्त मालेगाव तालुक्यातील खडकी येथील सुळेश्वर महादेव मंदीराच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी दादाजी भुसे यांनी, जमिनीच्या आरोग्यासाठी माती व पाणी परिक्षण महत्त्वाचे असून पाणी व खताचा अतिवापर टाळून मातीचे आरोग्य जपावे लागणार असल्याचे सांगितले. जमिनीच्या आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत, त्यावरून गावनिहाय जमिनीच्या सुपिकतेचा निर्देशांक दर्शविणारे फलक राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दर्शनी भागावर लावण्यात येणार आहेत. त्यात नमूद केलेल्या प्रमाणात खतांची मात्रा देणे शेतकऱ्यांना सुलभ होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. ज्या शेतकऱ्यांनी अजून माती, पाणी परिक्षण केलेले नाही त्यांच्यासाठी आदित्य कृषी सेवा केंद्र, चाळीसगाव फाटा, मालेगाव येथे मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, प्रमोद निकम, दीपक मालपुरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.