राज्यात पुन्हा खतांचा तुटवडा, शेतकरी संकटात..!

किसानवाणी :
खरिप हंगामातील पेरण्या केलेली पिकांची वाढीची अवस्था सुरू झाली असून त्यासाठी पुढील खत मात्रा देणे गरजेचे आहे. असे असताना ऐन हंगामातच शेतकऱ्यांना खतांच्या तुटवडा जाणवू लागला असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागणी केलेली खते मिळत नाहीत, उपलब्ध असल्यास जास्त दराने खरेदी करावी लागत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. औरंगाबाद, जालना, बीड, आदी जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली खते मिळत नसल्याची स्थिती कायम आहे. अनेक भागात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा आजही जाणवत आहे. इतरही अनेक खते मागणीनुसार मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात.

नांदेड, परभणी, हिंगोली, जिल्ह्यात युरियाची साठेबाजी करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात खत पुरवठा व्यवस्थित होत असून युरियाची उपलब्धता मागणीनुसार होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला युरियाचा तुटवडा भासला. शेतकऱ्यांना हवी असलेली मिश्रखते मिळाली नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या खतांवरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातही रासायनिक खतांची कमतरता असून शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. रत्नागिरीतही सुरुवातीला खताचा पुरवठा खंडित झाला होता, परंतु आता पुरेसा पुरवठा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात युरियाची टंचाई भासत आहे. विक्रेता व कंपन्यांकडून युरियासोबत डीएपी किंवा अन्य खते खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. 

सातारा जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पाहयला मिळत आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार टन युरियाची विक्री झाली असून सहा  हजार ९६० टन युरिया शिल्लक आहे. इतका साठा शिल्लक असला तरी शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याचे चित्र कायम आहे. काही कृषी सेवा केंद्रांकडून  टंचाई भासवून अधिक दराने विक्री केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या खतांची टंचाई निर्माण केली जात असून शेतकऱ्यांना अधिक दरात युरिया खरेदी करण्यास सांगितले जात आहे. 

सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता येथेही शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. डीएपीचा सध्याचा दर प्रतिपिशवी १२०० ते १२५० रुपये आहे, पण १३०० ते १४०० रुपये दराने खरेदी करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. युरियाचा दर २६७ रुपये आहे, पण त्यालाही ३५० ते ४०० रुपयांपर्यंत मोजावे लागत आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांना जादा दरात खतांची खरेदी करावी लागत आहे. युरिया १०.२६.२६. आणि दाणेदार फॉस्फेटची टंचाई सर्वत्र आहे. याला पर्याय म्हणून  डीएपी व पोटॉश हे महागडे खत शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. नाशिक जिल्हयातही मागणीच्या तुलनेत युरियाचा तुटवडा दिसून येत आहे.

याबाबत राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक विजयकुमार घावटे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात खताची टंचाई नाही, मात्र मागणीत वाढ झाली आहे,  कोविडमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याच पाळीवर खतांची जादा खरेदी करुन साठा करुन ठेवला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तसेच मॉन्सून सर्वत्र चांगला झाल्याने खत वापर आणि मागणी अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.