Homeतंत्रज्ञानफळे, भाजीपाला साठवणीसाठी 'या' सोप्या पध्दतीने बनवा ‘शून्य ऊर्जा शीतकक्ष’; तेही अगदी...

फळे, भाजीपाला साठवणीसाठी ‘या’ सोप्या पध्दतीने बनवा ‘शून्य ऊर्जा शीतकक्ष’; तेही अगदी शेतावर!

किसानवाणी :
शेतकऱ्यांसमोर सतत पीक लागणीपासून ते काढणीपर्यंत अनेक संकटे येतात. तर कधी कधी काढणी केल्यानंतरही पीकाचे, निघालेल्या उत्पादनाचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा उत्पादन घेतल्यानंतर बाजारात दर कोसळल्याने देखील विविध अडचणींचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अशावेळी शेतमालसाठवणुकीची समस्या शेतकऱ्यासमोर उभी राहते. फळे आणि भाजीपाल्याच्या बाबतीत तर ही समस्या शेतकऱ्याला नेहमीच सतावत राहते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि उत्पादनाची नासाडीही होते. 

सध्या उपलब्ध असणारी शीतगृहे आणि गोदामे शेतकरी वर्गाला परवडतीलच असे नाही, तसेच बऱ्याचदा शेतकऱ्याचा शेतापासून अशी शितगृहे आणि गोदामे दूरही असतात. अशा परिस्थितीत शेतकरी सहज साध्या पध्दतीने आपले उत्पादन कसे सुरक्षित ठेवू शकतो याची माहिती आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

शेतकरी आपले फळ आणि भाजीपाल्याचे उत्पादन कमीत कमी खर्चात अगदी सुरक्षित ठेवू शकतात. यासाठी शेतकरी विटा, बांबू, वाळू आणि गोणपाटाच्या वस्तूंपासून शीतकक्षाची बांधणी करू शकतात. ज्यामध्ये फळे आणि भाजीपाला साठवता येतो. यासाठी कोणत्याही यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत उर्जेची देखील गरज भासत नाही. त्यामुळेच या तंत्राला ‘शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष‘ असे म्हणटले जाते. 

शीतकक्षाची बांधणी :-

 • सुरवातीला विटांचे एक ते दोन थर रचून शीतकक्षाच्या तळाचा भाग १६५ सेंमी x ११५ सेंमी तयार करावा.
 • दोन विटांमधील अंतरात बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून घ्याव्या. या दोन भिंतीतील अंतर साधारणत: ७.५ सेंमी ठेवावे.
 • या दोन भिंतीमधील रिकाम्या जागेत देखील वाळू भरून घ्यावी. अशाप्रकारे वाळू आणि विटांच्या सहाय्याने हौद तयार करावा.
 • या हौदावर झाकण्यासाठी बांबू आणि कोरड्या गवताचे (१६५ सेंमी x ११५ सेंमी) छप्पर तयार करावे आणि त्याने शीतकक्ष झाकून घ्यावा. यामुळे शितकक्षाचे थेट सूर्यप्रकाश किंवा पवसापासून रक्षण होते.
 • शीतकक्ष शक्यतो झाडाखाली किंवा छपराखाली बांधावा. 
 • शीतकक्षाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूने दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोनवेळा पाणी शिंपडावे आणि भिंत चांगली ओली करावी.
 • ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूमधून पाईप ठेऊन त्याला ठिबक संचाच्या नळ्या जोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते.
 • नियमितपणे शीतकक्षावर दिवसातून दोन वेळा पाणी मारल्यास कडक उन्हामध्ये शीतकक्षातील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा १५ ते १८ अंश सेल्सिअस कमी असते.
Zero Energy Cool Chamber

कक्ष बांधणीनंतर घ्यायची काळजी :-

 • दिवसातून न चुकता दोनवेळा पाणी मारावे किंवा शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन नळी जोडून ठेवावी.
 • फळे आणि भाज्या प्लास्टिकच्या सछिद्र क्रेट्समध्ये ठेवून हे क्रेट्स पातळ पॉलिथीनच्या पेपरने झाकावे. 
 • बांबू, कागद, लाकूड यापासून बनविलेली खोकी टोपल्या शीतकक्षात वापरु नयेत.
 • साठवलेल्या फळे, भाजीपाल्यावर पाण्याचा थेट संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. 
 • ठराविक काळानंतर शीतकक्ष बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांच्या साहाय्याने स्वच्छ करावा.

शीतकक्षाचे फायदे :-

 • या शीतकक्षामुळे फळे आणि भाजीपाल्याचा साठवण कालावधी वाढवता येतो. 
 • फळे आणि भाज्या हिरव्यागार आणि ताज्या टवटवीत राहतात. 
 • चांगल्या दर्जामुळे दरही चांगला मिळतो.  
 • फळांची पिकण्याची प्रक्रिया मंद गतीने होते आणि त्यांच्या वजनातही घट येत नाही.
 • अशा प्रकारचा शीतकक्ष बांधणीसाठी कमी खर्च लागतो.
 • घराच्या शेजारी अथवा शेतावरही असा शीतकक्ष उभारणे सहज शक्य होते.
 • बाहेरील तापमानापेक्षा सुमारे १०-१५ डिग्री से. ने तापमान कमी असल्याने व तुलनात्मक आर्द्रता ९०% राहात असल्याने कोरड्या ऋतूत याचा जास्त उपयोग होतो.

महत्वाचे मुद्दे :-

 • वाहता वारा असलेली जागा निवडा
 • पाणी साठू देऊ नका
 • स्वच्छ, नव्या व अखंड विटा वापरा.
 • स्वच्छ वाळू वापरा, त्यामध्ये सेंद्रीय द्रव्ये किंवा माती नको
 • वाळू आणि विटा पाण्यात पूर्णपणे भिजवा
 • सरपटणारे प्राणी कक्षाजवळ येणार नाहीत याची काळजी घ्या
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments