Homeयोजनागोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, 'या' पद्धतीने करावा लागतो...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान, ‘या’ पद्धतीने करावा लागतो अर्ज

किसानवाणी | भारताची अर्थव्यवस्था शेती क्षेत्रावर अधिक अवलंबून आहे. शेती क्षेत्राला भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून देखील संबोधले जाते. त्यामुळे शेती क्षेत्राच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असतात. महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणत असते. अशाच कल्याणकारी योजना पैकी एक आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेअंतर्गत शेती व्यवसाय करतांना अपघात झाला, सर्पदंश होऊन मृत्यू झाला, विंचूदंशावर मृत्यू झाला, अंगावर वीज पडून मृत्यू झाला, शेतीचे काम करताना विजेचा शॉक बसला तर शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांना मदत केली जाते. चला तर जाणून घेऊया काय आहे ही नेमकी योजना..

शेती क्षेत्रात कार्य करताना कुठलाही अपघात होऊन मृत्यू झाला असेल अथवा अपंगत्व आलं असेल तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाद्वारे संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. अपघाताला बळी पडलेल्या शेतकऱ्यांचा विमासाठीचा प्रस्ताव विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसांपर्यंत कधीही विमा कंपन्यांकडे सुपूर्द करण्यात येतो. विम्याचा लाभ सातबारा धारक शेतकऱ्यांनाच दिला जातो, तसेच विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे वय 10 ते 75 या दरम्यान असणे अनिवार्य असते.

शेतकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा अर्ज नमुना कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून प्राप्त करून घ्यावा. एखादा शेतकरी अपघातात बळी पडला तर अपघात झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत प्रस्ताव देणे गरजेचे ठरते. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाचे विमा सल्लागार अपघाताची प्राथमिक छाननी करतात त्यानंतर संबंधित प्रस्ताव विमा कंपनीकडे सुपूर्द करण्यात येतो.

अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे दोन्ही डोळे किंवा कुठलेही दोन अवयव निकामी होऊन अपंगत्व आल्यास या योजनेअंतर्गत संबंधित शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचा निधी शासन पुरवीत असते. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होऊन अपंगत्व आले तर शासनाकडून एक लाख रुपयांचा निधी संबंधित शेतकऱ्याला आर्थिक साहाय्य म्हणून देऊ करण्यात येतो.

या योजनेअंतर्गत नैसर्गिक मृत्यू झाल्यास, आत्महत्येचा प्रयत्न केल्यास किंवा जाणीवपूर्वक स्वतःला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्यास, विमा कालावधी पूर्वीपासून असलेल्या अपंगत्वास, कुठलाही गुन्हा करताना झालेला अपघात, अपघात झालेला असताना अमली पदार्थाचे जर सेवन केले असेल तर, बाळंतपणातील मृत्यू,शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी असलेल्या व्यक्तीस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments