हवामान : मुसळधार पावसाचा अंदाज

किसानवाणी :
अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. तर लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे आज (ता. १५) चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस तमिळनाडू, केरळ, गोवा, कोकण किनारपट्टी, गुजरात, राजस्थान या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

  • शनिवारी (१५ मे) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा व विदर्भात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज आहे. रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात तर सोमवारी पालघर, भंडारा, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
  • २० मे पर्यंतचा हवामान अंदाज ( 👈 क्लिक करा)

चक्रीवादळ (cyclone) १८ मे रोजी गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचेल.याशिवाय चक्रीवादळाची तीव्रता वाढत असताना केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपवर निर्माण झालेल्या कमी उदासिनतेमुळे आयएमडीने आदल्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तिरुअनंतपुरमसह अनेक जिल्ह्यात मोठ्या पावसासह सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच कोकण किनारपट्टीजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. 

गेल्या तीन दिवसांपासून अरबी समुद्रात अतितीव्र कमी दाब क्षेत्राचा प्रभाव वाढत आहे. हे क्षेत्र शुक्रवारी (ता. १४) अमिनीदेवीपासून नैऋत्येकडे ८० किलोमीटर, कन्नूरपासून ३६०, तर वेरावलपासून ११७० किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याचे दिसून आले. या तीव्र कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर त्याचा वेग आणखी वाढणार आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किलोमीटर वरून हळूहळू वाढत जाऊन तो १०० किलोमीटर पर्यंत जाईल. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यानंतर ताशी वेग १०० वरून १४० किलोमीटर, तर सोमवारी (ता. १७) अतितीव्र चक्रीवादळामुळे १५० ते १६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. तर मंगळवारी (ता.१८) सकाळी अतितीव्र स्वरूपातील चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. 

सध्या या चक्रीवादळामुळे राज्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला आहे. तसेच राज्यातही त्याचा काहीसा परिणाम होत असून, पश्‍चिम महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात कमीअधिक झाले आहे. या चक्रीवादळामुळे चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्रादरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाट व मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होतील.