पावसाच धुमशानं : मुंबईत पुढील 4 दिवस मुसळधार, रेड अलर्ट जारी

किसानवाणी : पावसाने आज मुंबईला चांगलंच झोडपून काढलं आहे. जूनच्या पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळाली. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट (Red alert) दिला आला आहे. तर पुढचे 3 ते 4 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशाराही IMDच्या वतीने देण्यात आला आहे. प्रतितास 2 ते 3 सेंटीमीटर पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गेल्या तीन तासात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. सांताक्रूझमध्ये 164.8 मिमी, कुलाबामध्ये 32.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोकण किनारपट्टीच्या काही जिल्ह्यांसाठी यलो आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसाठी रेड अलर्ट आणि पुढील 4 दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी येथे पुढील चार दिवस मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडी मुंबईच्या शुभांगी भुते यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.