हवामान अंदाज १२ ते १८ ऑक्टोबर २०२०; राज्यात पावसाचा जोर वाढणार

किसानवाणी :
सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकण गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच कर्नाटक राज्यात हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असून यामुळे शेतकरी वर्गाला मात्र अनेक ठिकाणी खरिपाच्या पिकांच्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. 

गेले दोन दिवस राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्या गुजरात व मध्य प्रदेशातून मान्सूनने माघार घेतली आहे. तर येत्या काही दिवसात महाराष्ट्रातही परतीच्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर कर्नाटकच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचा प्रभाव काहीसा कमी झाला असून ते उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. चक्राकार वाऱ्याची अशीच स्थिती रायलसिमा आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवरही निर्माण झाली आहे.

येथे पहा संपूर्ण आठवड्याचा हवामान अंदाज –
http://www.imdpune.gov.in/Weather/Press/weather_in_marathi.pdf

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या १३ ऑक्टोबर रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, व मराठवाड्याच्या विविध भागात पाऊस पडणार आहे. १४ ते १६ ऑक्टोबर रोजी वरील ठिकाणांसह विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. 

१३ ते १६ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागात सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.   

सध्या राज्यात सुरू असलेल्या तुरळक पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला असून काही ठिकाणी धुके देखील पडत असल्याचे दिसून येत आहे. तर दिवसभराच्या तापमानातही कमालीची घट झाली आहे. दरम्यान बुधवारी (१४ ऑक्टोबर) अंदमानच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन राज्यात काही प्रमाणात ढगाळ हवामान राहील तर बऱ्याचशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.