Homeबातमी शेतीचीनिसर्गाच्या अमर्याद किमयेचं आणि शेतकरी बांधवांचं महत्व, येणारा काळ नक्कीच दाखवून देईल!

निसर्गाच्या अमर्याद किमयेचं आणि शेतकरी बांधवांचं महत्व, येणारा काळ नक्कीच दाखवून देईल!

किसानवाणी :

Sayali Ghadge :
तसं बाजारातून भाजी घेऊन येण्याचे काम बऱ्याचदा माझ्याकडेच असते. त्यामुळे काहीवेळा माझ्याच आवडीची भाजी खरेदी करून आईला तिच भाजी बनवायला सांगणे हा त्यामुळे होणारा खूप चांगला फायदा. मी व्हेज आणि नॉन-व्हेज या दोन्ही प्रकारात मोडते. कारली आणि तोंडली सोडली की सगळ्याचं भाज्या खायला आवडतात मला. त्यामुळे या दोन भाज्यांव्यतिरिक्त कोणतीही भाजी दिसली की ती मी विकत घेतेच.

मी शाळेत असल्यापासून आईसोबत किंवा बाबांसोबत बाजारात भाजी आणायला जायचे. तसे ते स्वतः च मला घेऊन जायचे. पैशांचे व्यवहार, बाजारातल्या भाज्यांचे व इतर वस्तूंचे भाव आणि स्पेशली ‘बार्गेनिंग’ कशी नि कुठे करायची ह्या सगळ्या गोष्टींचे ज्ञान मला त्या ‘भाजीमार्केट सफारीतून’ मिळाले. त्यामूळे आता भाजी आणायची झाली तर आईला मी पटकन आणून देते. पण पुष्कळदा भाजीला जाऊनही मला एक गोष्ट अलीकडेच जाणवू लागली. ती म्हणजे, ह्या भाज्यांना प्राप्त झालेले नैसर्गिक सौंदर्य.

यापूर्वी मी कधीच इतका विचार केला नव्हता भाज्यांबद्दल. पण म्हणतात ना, ‘वयानुसारही विचार प्रगल्भ होत जातात’ बहुतेक तसं काहीतरी असावं. तर सहसा भाजी खरेदीसाठी मी माझ्या घराजवळच्या बाजारात जाते. मार्केट मध्येही सध्या दिल्लीत सुरू असलेल्या केंद्रीय कृषीकायद्यांविरोधातल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा कानावर पडत राहते. तर डोळयांना रंगीबेरंगी, हिरवीगार, ताजी ताजी भाजी नजरेस भुरळ पाडते. बाजारातला परिसर गोंगाट आणि कल्लोळमय जरी वाटत असला तरी ह्या भाज्यांमुळे होणाऱ्या नेत्रसुखाने त्याची तसूभरही अडचण किंवा त्रास जाणवत नाही.

हिरवी,पोपटी, लाल, केशरी, राखाडी, मातकट इ. सगळ्याच ‘कलर्स आणि शेड्स’ च्या,वेगवेगळी जीवनसत्त्व घेऊन जन्माला आलेल्या भाज्या असतात. त्यांचे भावही त्यांच्या रुपाला अनुसरूनच लावलेले दिसतात. अगदी काही भाज्या तर बनविल्या नंतर जितक्या आकर्षक वाटत नाहीत तितक्या त्या कच्च्या असताना दिसतात. तर काही भाज्या त्यांच्या रंगामुळेच मला ‘इम्प्रेस’ करतात. या भाज्यांची नावं देखील त्यांच्या दिसण्यावरून हुबेहूब शोभणारीच दिली गेलीयत. मला ह्या गोष्टीची विशेष उत्सुकता वाटते कधीकधी की, ‘कोणाला सुचली असतील अशी भाज्यांची भन्नाट नावं’? किंवा ‘ही विशेष भाजी या पृथ्वीवर सगळ्यात आधी कुठल्या माणसाने टेस्ट केली असेल?’ असे खूप प्रश्न पडतात मला काहीवेळा.

हल्ली युट्यूब वरती कुठल्या पदार्थाची रेसिपी पाहिली की, बाजारातून तशीच भाजी आणून ती वेगळ्या पद्धतीने बनविण्यात पण मजा येते. आजकलची तरुणाईदेखील आपल्या आहारात ‘सॅलेड’ चा सहभाग आवर्जून करू लागलीय. मला वाटते, ती याच कलरफुल आणि मोहक दिसणाऱ्या भाज्यांची कमाल आहे.

कधी कधी वाईट एका गोष्टीचे वाटते. बाजारात विक्रीसाठी आणलेल्या भाज्या पूर्णपणे विकल्या गेल्या नाहीत तर त्या सडून जातात. मग विक्रेता ढिगाने त्याला कचऱ्याच्या गाडीत भरून टाकतात. तसं ‘Nothing is permanent here’.एक-दोन दिवसांचे का असेना शेवटी आयुष्यच ते. मग मनोमन कौतुक वाटतं ते या निसर्गाच्या अमर्याद किमयेचं नि ह्या भाज्या पिकविण्याऱ्या शेतकरी बांधवांचं. दोघांचेही गांभीर्य आत्ता लक्षात आले नसले तरी येणारा काळ मात्र त्यांचे महत्त्व सर्वांना नक्कीच दाखवून देईल.
सायली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments