शेतकऱ्यांच्या ५० हजार रूपयांच्या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापूरात महत्वपूर्ण घोषणा

किसानवाणी : राज्यसरकारने दोन लाख रूपयांपर्यंत थकबाकी असलेले पिक कर्ज माफ केले. त्यानंतर दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची विधीमंडळात घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण होते, पण कोरोना महामारीमुळे राज्यावर अर्थिक संकट ओढवल्याने यात दिरंगाई झाली. त्यामुळे आता आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर दोन लाखांवरील कर्जमाफीसह ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान निश्चित दिले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते. 

कोल्हापूरात प्रशासनासोबत झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर, राज्यसरकार शेतकऱ्यांना ५० हजार रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कधी देणार? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. याबाबत बोलताना पवार म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी कर्जमाफीची आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. पण त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली. आता दुसरी लाट आली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. पण प्रोत्साहनपर अनुदान आणि दोन लाखांवरील कर्जमाफीची घोषणा विधीमंडळाच्या रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर राज्यसरकार निश्चितपणे प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखांवरील कर्जमाफी देणार आहे. 

नियमित कर्ज भरणारे व दोन लाखांवरील थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. ३० जून २०२० पर्यंत कर्जाची पूर्णफेड केली, तर त्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये व ज्यांची रक्कम २ लाखांवरील आहे, त्यांनी वरील रक्कम ३० जूनपर्यंत भरली तर त्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण याबाबत शासनाने कोणताही अद्यादेश काढला नसल्यामुळे शेतकऱ्यांसह बँकाही संभ्रमात होत्या. परंतु आज (१४ जून २०२१) उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेल्या ग्वाहीमुळे प्रोत्साहनपर अनुदानाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.