नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

किसानवाणी :
महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रखडलेली कर्जमाफी प्रक्रिया आणि यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळण्यात निर्माण झालेली अडचण यामुळे दूर होणार आहे. असे असले तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर रक्कमेबाबत सरकारने अद्यापही कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाही.

याबाबत सरकारी पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया जुलै अखेर पार पडल्यानंतर, ऑगस्ट ते स्पटेंबर पर्यंत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. त्यादृष्टीने शासनस्तरावर प्रक्रिया सुरू असून जिल्हा पातळीवर अशा शेतकऱ्यांची यादीही तयार असल्याचे सांगितले जात आहे. या याद्या जुलैनंतर एकत्रित करून राज्यसरकार ही प्रक्रिया वेगाने पार पाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी महाराष्ट्रातील ३२ लाख शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी जवळपास १९ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर मार्च अखेरपर्यंत १२ हजार कोटी रूपये वर्ग करण्यात आलेत, तर निधी अभावी ११ लाख १२ हजार खातेदारांना ८,१०० कोटींचा लाभ देणे अद्याप बाकी आहे. या उर्वरित शेतकऱ्यांना ३० जून रोजीच्या शासननिर्णयानुसार २००० कोटी रूपयांची निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.