Homeबातमी शेतीचीसोयाबीन वायद्यात सुधारणा; शेतकऱ्यांना थोडा दिलासा

सोयाबीन वायद्यात सुधारणा; शेतकऱ्यांना थोडा दिलासा

किसानवाणी : बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या भूमिकेवर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. वायदे आणि हजर बाजारात सोयाबीनचे दर दोन दिवसांत ५०० ते ८०० रुपयांनी पडल्यानंतर बुधवारी (ता. १) दरात काहीशी सुधारणा झाली होती.

केंद्रीय पशुसंवर्धनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनची मागणी पुढे रेटत विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहून साडेपाच लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे दर पडले होते. सोमवारी ही बातमी सगळीकडे पसरल्यानंतर मंगळवारपर्यंत सोयाबीनच्या दरात जवळपास ५०० ते ८०० रुपयांची घसरण झाली होती. वायद्यांतही ५०० ते ७०० रुपयांची घसरण झाली होती.

मात्र बुधवारी (ता. १) वायद्यांत काहीशी सुधारणा झाली होती. डिसेंबरचे वायदे २१२ रुपयांनी सुधारून ६ हजार १३० रुपये ते ६ हजार ३५६ रुपयांनी झाले. जानेवारीच्या वायद्यांत २२९ रुपयांची वाढ झाली होती. तर वायदे ६ हजार ३३ रुपये ते ६ हजार ३४९ रुपयांनी झाले. 

दरम्यान, रूपाला यांच्या भूमिकेचा सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी रुपाला यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची सूचना केली. तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून सोयापेंड आयातीला मुदत देऊ नये, अशी मागणी केली. महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही रूपाला यांच्यावर टीका करत हा निर्णय शेतकऱ्यांना मातीत घालणारा असल्याचे म्हटले आहे.


एनसीडीईएक्सवरील हजर बाजारातही सुधारणा झाली आहे. सोयाबीन दरात बुधवारी दोन टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. या सुधारणेसह सोयाबीनचे व्यवहार इंदूर येथील केंद्रावर ६ हजार ३२१ रुपयांनी झाले. तर कोटा येथे ६ हजार ३८१ रुपयांनी सोयाबीन विकले गेले. नागपूर येथे व्यवहार ६ हजार ४१३ रुपयांनी झाले. तर अकोला येथील केंद्रावर सोयाबीनला ६ हजार ३६३ रुपये दर मिळाला. वायद्यांबरोबरच हजर बाजारातही सुधारणा झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments