Homeबातमी शेतीची'या' कारणांमुळे वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादन

‘या’ कारणांमुळे वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादन

किसानवाणी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्याची वाढलेली उपलब्धता यामुळे निश्चित दर मिळणाऱ्या पिकाकडे शेतकरी वळू लागलेत. ऊस हे असेच पीक असून जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऊस पिकाच्या लागवडीमुळे जिल्ह्याचे अर्थकारणदेखील बदलत असून येत्या काळात हा बदल अधिक पहायला मिळणार आहे. 

जिल्ह्यात भात शेती अधिक प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर किनारपट्टीच्या भागात आंबा, काजू, कोकम, नारळ याचे उत्पादनही घेतले जाते. काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भात पिकाखालील क्षेत्र ७५ हजार हेक्टरवर होते. खरिपात भातशेती ही जिल्ह्याच्या अधिकतर भागाची शेती होती. या शिवाय नाचणी, वरी अशी पिके घेतली जायची. २००१च्या सुमारास जिल्ह्यात ऊस शेतीला सुरवात झाली. तेव्हा हाताच्या बोटांवर मोजण्या इतके शेतकरीच ऊस शेती करीत होते. २००३मध्ये अवघे १४२ हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते, तर उत्पादन फक्त २ हजार ७०० टन होते. याच वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याच्या असळज या गावी डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सुरू झाला. गगनबावडा तालुका सिंधुदुर्गाला जोडणारा असल्याने डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व कणकवली हे दोन तालुके समाविष्ठ झाले. त्याच दरम्यान जिल्ह्यातील कुर्ली घोणसरी मध्यम प्रकल्प, कोर्ले सातंडी प्रकल्प, या शिवाय अनेक लघू प्रकल्प पूर्ण झाले. तर काही प्रकल्पांची पूर्णत्वाकडे वाटचाल होती. यामुळे जिल्ह्यात सिंचनाची उपलब्धता वाढली आहे.

भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्यायी शेतीची गरज होती. याच दरम्यान जिल्ह्यात वाढलेली पाण्याची उपलब्धता आणि हक्काचा साखर कारखाना यामुळे येथील शेतकऱ्यांना ऊस शेतीचा पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीची काही वर्षे ठराविक गावातच उसाचे क्षेत्र वाढले. परंतु त्यानंतर मात्र टप्प्याटप्प्याने उसाचे क्षेत्र वाढत गेले. ही वाढ दरवर्षी दुप्पट ते तिप्पटीने झाली. त्यामुळे जिल्ह्याची ऊस उत्पादन क्षमतादेखील वाढू लागली.

ऊसाला मिळणार हमखास दर आणि साखर कारखान्याच्या रूपाने शाश्वत बाजारपेठ उपलब्ध असल्याने शेकडो शेतकऱ्यांनी भात पिकांचे क्षेत्र ऊस लागवडीखाली आणले. तर काही शेतकऱ्यांनी पडीक जमिनीचे सपाटीकरण करून ऊस लागवड सुरू केली. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी अवघे १४२ हेक्टर असणारे ऊसाचे क्षेत्र आता १ हजार ८०० हेक्टरवर पोहोचले आहे. तर फक्त २ हजार ७०० टन असणारे ऊस उत्पादन आता १ लाख ५ हजार टनांच्या वर गेले आहे. याचा मोठा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 

सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी व कणकवली तालुक्यांत मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. याशिवाय दोडामार्ग, कुडाळ, देवगड, मालवण, सावंतवाडी तालुक्यांतील काही भागांत ऊस शेती केली जात आहे. तर शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात देखील शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मध्यम आणि लघू प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धता आणखी वाढणार आहे. परिणामी ऊस पिकाखालील क्षेत्रात देखील आणखी वाढ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments