कोल्हापूर : ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला

किसानवाणी :
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात सध्या ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. पन्हाळा तालुक्यातील उत्रे, वाघवे यवळूज, पडळ, सातार्डे, खोतवाडी, माळवाडी, देवठाणे, कसबा ठाणे आदी गावात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या शेतकरीवर्गाकडून कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. लोकरी माव्याच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची भिती शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.

जिल्हातील सर्वच तालुक्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतली जाते. पश्चिमेकडच्या अतिपावसाच्या भागात ऊसाचे एकरी उत्पादन कमी असले तरी हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून शेतकरी ऊस शेतीला प्राधान्य देतात. सध्या पावसाने उघडीप दिल्याने वातावरणातील बदलामुळे लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऊन-पाऊस, दमट व ढगाळ वातावरणामुळे लोकरी माव्याचा प्रसार झपाट्याने होत आहे.

लोकरी माव्याला प्रामुख्याने ८६०३२ व ९००५ या जाती अधिक बळी पडताना दिसत आहेत. आडसाली ऊस पिक असल्याने उसामध्ये शर्करेचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळे लोकरी मावा अधिकच वाढत असल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यात हुमणीमुळे ऊसाचे नुकसान झाले तर आता लोकरी माव्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान होऊ लागल्याने कृषि विभागाने शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करावे असे मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

  • कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने आणि ढगाळ हवामानामुळे ऊस पिकावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढलाय. लोकरीमाव्यामुळे पानांवर मोठ्या प्रमाणात काळी बुरशी वाढत असल्याने पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया देखील मंदावत असल्याने ऊस पिकाची वाढ खुंटू लागलीय. यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकात लोकरीमाव्याची तिव्रता पाहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी मगरी अळी अर्थात क्रायसोपर्ला कार्नी ही मित्र कीड आढळल्यास लोकरी माव्याचा निसर्गतःच बंदोबस्त होतो. अशावेळी किटकनाशक वापरण्याची फारशी गरज पडत नाही. परंतु ही मगरी अळ्या दिसून येत नसल्यास लोकरीमाव्याच्या तिव्रतेनुसार रोगर, हमाला, क्लोरोपायरिफॉस यापैकी कोणतेही एक किटकनाशक १५ लि पंपाला २० ते २५ मिली फवारावे. पाऊस सुरू असल्यास औषध धुवून जाऊ नये यासाठी  बाजारात उपलब्ध असणारे एखादे स्टीकर किटकनाशकासोबत मिसळून फवारणी करावी.