रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचे अभियान; शेतकऱ्यांना मिळणार शासकीय अनुदानाचा लाभ

किसानवाणी : भारतात बहुतांश शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करतात. परंतु त्यांना त्यांच्या मेहनतीच्या प्रमाणात कमी मोबदला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नगदी पिकांच्या लागवडीचा सल्ला दिला जातो. शासन देखील यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असते. या हेतूनेच महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या साठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.

महाराष्ट्रात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र रेशीम मंडळाने एक जागरूकता अभियानाची सुरवात केली आहे. ह्या अभियानाची सुरवात 25 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. ह्या अभियानातून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाविषयीं माहिती दिली जाणार आहे. रेशीम पासुन कुठली उत्पादने हे तयार होतात याविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच मनरेगा आणि पोखरा योजनेंतर्गत तुती रेशीम उद्योगात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी देखील या अभियानांतर्गत केली जाईल.

रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल असा कृषी विभाग अंदाज वर्तवीत आहे. तसे पाहता महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत रेशीम लागवडीचे क्षेत्र हे लक्षणीय वाढत आहे. मात्र, तरीदेखील रेशीम शेतीत व उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रेशीम विकास मंडळ गावागावात जाणार आहे आणि शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.  ह्या अभियानाद्वारे रेशीम शेतीचा खर्च आणि त्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान याची माहिती देऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक तुतीची लागवड करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.