अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खा. संभाजीराजेंच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे महत्वाच्या मागण्या

किसानवाणी :
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून  मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

शेतकऱ्यांविषयी या मागण्या करत असताना खा. संभाजीराजे यांनी शिवरायांच्या, “कष्ट करून गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडी ने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल.” याचा संदर्भही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिला आहे. 

संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हणटले आहे की, मी स्वतः अनेक ठिकाणी, दोन दोन किलोमीटर चालत जाऊन नुकसानी ची पाहणी केली आहे. त्यामुळे जे रस्त्यावरून दिसत आहे, त्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर असल्याची बाबही संभाजीराजे यांनी सांगितली आहे. 

संभाजीराजेंनी नुकसानग्रस्तांसाठी सरकार कडे केलेल्या मुख्य मागण्या – 
1) 2005 चा राज्य आपत्ती व्यवस्थापन कायद्या ची अंमलबजावणी करण्यासाठी कॅबिनेट च्या बैठकीत ठराव घेऊन ‘ओला दुष्काळ आणि गंभीर पूरपरिस्थिती’ जाहीर करणे. तसेच, केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत मदत मागण्यासाठी चा प्रस्ताव तात्काळ तयार करून तो केंद्राकडे पाठवणे. त्या कायद्यानुसार, एका आठवड्यात निरीक्षण पथक राज्यात येईल, आणि राज्याला निधी मंजुरी साठी पाठपुरावा करता येईल.
2) शेतकऱ्यांना सरसकट 50000 हेक्टरी भरपाई देणे. ही जवळपास सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. 
3)पीकविमा कंपन्यांना ताकीद देऊन त्यांना शेतकरी हितासाठी काम करण्यास भाग पाडणे. कारण बऱ्याच विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत आहेत.
4) ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत, ज्यांच्या शेतात खडक साचून पडलेत, त्यांच्या नुकसान भरपाई साठी वेगळी तरतूद करून विशेष पॅकेजची घोषणा करणे. 
5) ज्या शेतकऱ्यांचा ऊस पावसामुळे आडवा पडला आहे, त्यांच्या उसाचा उठाव हा प्राथमिकतेने, सर्वात आधी करण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश देणे. 
6) ज्या शेतकऱ्यांची गुरे ढोरे वाहून गेली आहेत, त्यांच्या साठी नुकसान भरपाईची तरतूद केली पाहिजे. 
7) जी घरे वाहून गेली आहेत, किंवा पावसामुळे पडली आहेत, त्यांना मदत करणे.
8) सर्वात महत्वाचे, पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून घेणे.
9) अनेक ठिकाणी अतिरिक्त पावसाने रानात चवाळ लागली आहे, तेथील उभ्या पिकांचे तर नुकसान झाले आहेत, त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना रब्बी च्या हंगामाला सुद्धा मुकावे लागणार आहे. त्याबाबत सुद्धा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 
10) तेलंगणा राज्याने तात्काळ स्वरूपात, प्रतिहेक्टरी 10000 रुपयांची तात्काळ मदत पोचवली, त्याप्रमाणे महाराष्ट्राने सुद्धा तशीच अंमलबजावणी करावी अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे.