Homeपीकपाणीतब्बल ५०० एकरांवर फुलवली कोथिंबिर, शेतकऱ्यांना होणार चांगला फायदा

तब्बल ५०० एकरांवर फुलवली कोथिंबिर, शेतकऱ्यांना होणार चांगला फायदा

किसानवाणी :
कोथंबीर पीक तेही तब्बल ५०० एकरात, आहे ना आश्चर्य.. होय परंतु हे खरं असून यामुळे नांदेड जिल्ह्यातील शहापूर चांगलच चर्चेत आलयं. गाव करी ते राव काय करी या म्हणीप्रमाणे शहापूर गावाने ही म्हण यानिमित्ताने खरी करुन दाखवलीय. या भागात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ५०० एकरांवर धन्याचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी कोथिंबीर पिकाची लागवड केली आहे. कोथिंबीर हे पिक कमी खर्चात आणि कमी वेळात येणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवून देते.

एक एकर कोथंबीर पिकाचा विचार केला तर त्यापासून साधारणतः १० क्विंटल धने उत्पादन होते. प्रतिक्विंटल धन्याला ७ हजार ते १० हजारच्या दरम्यानचा भाव मिळतो. त्यामुळे एकरी साधारण पणे ७० ते १ लाख रूपयापर्यंतचे उत्पादन सहज हाती येते. तसेच जमिनीत एकाच प्रकारचे पीक वारंवार घेतल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव देखील अधिक प्रमाणात वाढतो. त्यामुळे काही काळ पारंपारिक पिकांना फाटा देत पीक फेरपालट केल्याने उत्पादनही चांगले येते. या गोष्टींचा विचार करूनच येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत कोथिंबीरीची लागवड करण्यावर भर दिला आहे. 

कोथिंबीर पिकाचा विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते तसेच पिकाची काढणी हार्वेस्टरच्या सहाय्याने होत असल्याने मजूरांच्या येणाऱ्या समस्याही भेडसावत नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी कोथिंबिरीला मुख्य पिकाचा दर्जा देऊन कोथिंबीरीची लागवड केली आहे. या पिकातून एकरी कमीत कमी ५० हजार रुपयापर्यंत नफा येथील शेतकऱ्यांना मिळू शकतो. 

धन्याचे उत्पादन मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये धने पावडर बनवण्याची मशीन खरेदी करून कंपनी स्थापन करण्याची येथील शेतकऱ्यांची इच्छा आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील हजारो शेतकरी येथे येत असतात. तसेच या शेतकऱ्यांना जिरे पावडरचा कारखाना सुरू करायचा असून अनेक जण त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. गटशेतीचा हा अनोखा प्रयोग पाहून इतर शेतकऱ्यांनी त्याचे अनुकरण केल्यास उत्पादनात आणि उत्पन्नात चांगली वाढ होण्यास मदत होणार आहे.

शेतकरी…

१९८० सालापासून आम्ही धने पिकवत होतो. परंतु काही काळाने हरभरा पिक आल्याने शेतकरी वर्गाने धने पिकाला फाटा देत हरभरा पीक घेण्यास सुरवात केली. परंतु सध्या हरभऱ्यावर घाटे अळी आणि मररोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा धने पीकाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. एकरी १२ किलो धने पेरावे लागते, पिकाला २५ किलो डीएपी दिले तरी चालते, आणि एखादी बुरशीनाशकाची फवारणी केल्यास पीक रोगकिडीपासून मुक्त राहते. कमी मजूर लागतात, तसेच हार्वेस्टरने काढणी होत असल्याने मजूरांची समस्या देखील येत नाही. 

रमेश चलवदे, कृषि अधिकारी

”रब्बी हंगामात पारंपारिक पिके घेतल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळे काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत धने लागवडीचा प्रयोग केला आहे. या पिकावर कीड रोग तुलनेने कमी प्रमाणात येतात. तसेच हे पीक ९० दिवसात निघते. इतर पिकांच्या तुलनेने पाणी कमी लागते, तसेच उत्पादन खर्चही कमी येतो त्यामुळे एकरी साधारणतः ९० दिवसाच्या कालावधीत ४० ते ५० हजारांचा नफा या पिकापासून मिळतो. येत्या काळात विकेल ते पिकेल या अभियानाअंतर्गत यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून, धन्यावर प्रक्रिया करून त्याची पावडर बनवण्यात येणार आहे. तयार झालेल्या पावडरीचे पॅकिंग आणि ब्रॅंडिग करून त्याचे विक्री व्यवस्थापन करण्यावर कृषी विभागाचा भर राहणार आहे”. 
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments