86032 वाणापेक्षा सरस वाणाचे संशोधन, आता मिळेल ऊसाचे भरघोस उत्पादन आणि अधिक साखर उतारा

किसानवाणी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव केंद्राने कोएम. 0265 व एम.एस. 0602 या दोन ऊसाच्या वाणांच्या संकरातून एम.एस. 13081( फुले 10001) हा लवकर पक्व होणारा नवीन वाण विकसित केला आहे. या वाणास राष्ट्रीय पातळीवर मान्यता (Nationally recognized) मिळाली आहे.

एम.एस. 13081 हा उसाचा वाण 29 ते 31 मे 2017 रोजी परभणी येथे पार पडलेल्या 45 व्या संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत सुरू आणि पूर्व हंगाम लागवडीसाठी महाराष्ट्रात शिफारस करण्यात आला होता. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने विकसित करून प्रसारित केलेला हा पहिलाच ऊसाचा वाण आहे.

या वाणाच्या अखिल भारतीय पातळीवर दक्षिण भारतातील केरळ (Keral), तामिळनाडु (Tamilnadu), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh), तेलंगाणा (Telangana), कर्नाटक (Karnataka), छत्तीसगढ (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) (द्विपकल्पीय विभागात) या 9 राज्यातील 14 वेगवेगळ्या संशोधन केंद्रावर (Research Center) एम.एस. 13081 सन 2016-17 आणि 2017-18 या दोन वर्षात एकृूण 34 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

या 34 चाचण्यांमध्ये (2 लागण पिके आणि 1 खोडवा) ऊस उत्पादन (Sugarcane Production), साखर उत्पादन (Sugar Production) आणि साखर उतारा या बाबतीत हा वाण तुल्यवाण कोसी 671 आणि को. 86032 या वाणांपेक्षा सरस आढळून आल्यामुळे दि.19 ऑक्टोबर 2020 रोजी लखनऊ (Lucknow) येथे अ‍ॅानलाईन झालेल्या अखिल भारतीय समन्वित ऊस संशोधन प्रकल्पाच्या 33 व्या द्विवार्षिक कार्यशाळेत या वाणाची दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात (Gujrat)आणि महाराष्ट्र (Maharashtra) (द्विपकल्पीय विभागात) या 9 राज्यात लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

साखर उत्पादनाच्या बाबतीत या वाणाचा विचार केला तर घेण्यात आलेल्या 34  चाचण्यां पैकी 19 चाचण्यांमध्ये एम. एस.13081 हा वाण पहिल्या तीन क्रमांकात आलेला आहे. यामध्ये सुक्रोज चे प्रमाण सरासरी 19.78 टक्के आढळून आले आहे. उसाच्या खोडव्यासाठी हा वाण उत्तम प्रतीचा आहे. या वाणापासून खोडव्याचे ऊस उत्पादन जवळजवळ 101.48 मेट्रिक टन प्रतिहेक्‍टर मिळाले आहे. तसेच पूर्व हंगामाचा विचार केला तर या वाणापासून मिळणारे सरासरी ऊस आणि साखरेचे उत्पादन अनुक्रमे 151.09 मेट्रिक टन प्रति हेक्टर आणि 21.53 मेट्रिक टन प्रति हेक्‍टर आहे.

 या वाणाची वैशिष्ट्ये

  • उसाची जात मध्यम ते भारी जमिनीत तसेच क्षारपड जमिनीतही उत्तम प्रकारे येते.
  • या जातीच्या उसामध्ये फुटव्यांचे प्रमाण अधिक असल्याने खोडव्याचे उत्पादन जास्त मिळते.
  • या वाणाच्या उसाची पाने गर्द हिरवी,आकाराने रुंद व सरळ वाढणारी असतात. पानांच्या देठांवर कूस आढळून येत नाही व पाचट सहजपणे निघते.
  • हा वाण खोडकीड, कांडी कीड, शेंडे कीड तसेच लोकरी मावा या साठी उत्तम प्रतिकार क्षमता असलेले आहे. तसेच मर आणि लाल कूज रोगास मध्यम प्रतिकारक आहे.
  • हा वाण पाण्याचा ताण सहन करू शकतो.
  • गळीत हंगामात अधिक साखर उतारा देण्यासाठी हा वाण कारखान्यांच्या पसंतीस पडलेला आहे.
  • महाराष्ट्रात या वाणाची पाच टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड केली जात आहे.