आता मधुमेह झालेले लोकही खाऊ शकतात ‘या’ वाणाचा भात..!

किसानवाणी :
ज्या व्यक्तींना मधूमेहाची समस्या आहे अशा लोकांना भात खाण्यास मनाई केली जाते. डॉक्टर लोकांचा हा सल्ला पाळला नाही तर त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते. परंतु आता अशा मधुमेही लोकांनाही आता भात खाता येणार असून त्यामुळे मधुमेहाची समस्या अजिबात आड येणार नाही. कारण संशोधकांनी अशा भाताचा वाण शोधला आहे, जो भात प्रत्येकजण खाऊ शकणार आहेत. मधुमेहाचा आजार असलेले व्यक्तीही या वाणाचा भात खाऊ शकणार आहेत. 

हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्था आणि सेल्युलर आणि आण्विक जीवशास्त्र केंद्रातील संशोधकांनी उन्नत सांभा मंसूरी हे वाण विकसीत केले आहे. येथील मुख्य संशोधक डॉ. रमन मीनाक्षी सुंदरम उन्नत सांभा मंसूरी वाणाविषयी म्हणतात की, आयआरआरआय आणि सीसीएमबी हैदराबादच्या संशोधकांनी एकत्रित येऊन हे वाण विकसीत केले आहे, जे बॅक्टिरिअल ब्लाईट रोग प्रतिरोधक आहे. 

दक्षिण भारतातील शेतकरी अनेक वर्षांपासून धानाची शेती करतात, यात ते सांभा मंसूरी वाणाची नेहमी लागवड करत असतात. हे शेतकरी बॅक्टिरिअल ब्लाईट रोगाने पीडित होते. हा रोग बॅक्टिरिया मुळे होत असतो, यामुळे धानाचे पाने ही पिळवी पडत असतात. यामुळे उत्पादनात घट होऊन फक्त ५० टक्के उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात राहत असे. त्यानंतर सीसीएमबी आणि आयआयआरआर च्या संशोधकांनी यावर काम करण्यास सुरुवात केली.

जंगलातील काही वाणावर संशोधकांनी काम केले. जंगली वाणांमध्ये बॅक्टिरिअल ब्लाईट प्रतिरोधक जीन्स सापडले, ते जीन्स संशोधकांनी या वाणांमध्ये हस्तांतर केले. अशाप्रकारे या उन्नत सांभा मंसूरी वाणाचा विकास झाला. मागील वर्षापासून शेतकऱ्यांना यात फरक दिसून आला. भातावर येणारा बॅक्टिरिअल ब्लाईट रोग आता दिसत नसून उत्पन्न चांगले येत आहे. या वाणाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे, सांभा मंसूरी या वाणाचे पीक सात ते दहा दिवस आधी तयार होते. 

सध्या दक्षिण भारतासह उत्तर भारतातही या वाणाची शेती केली जाते. डॉ. सुंदरम म्हणतात, आता सात ते आठ राज्यांमध्ये याची शेती केली जाते. आंध्रप्रदेशात ६० ते ६५ हजार हेक्टरमध्ये याची शेती होत आहे. कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि मागील दोन ते तीन वर्षात कृषी विभागाच्या मदतीने उत्तर भारतात याची शेती केली जात आहे. या वाणाचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे, ते म्हणजे यात ग्लाईसेमिक इंडेक्सचे प्रमाण फार कमी असते. इतर वाणाच्या तुलनेत यात याचे प्रमाण कमी असते. दुसऱ्या वाणांमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सचे प्रमाण हे ६२ ते ७० टक्के असते पण सांबा मंसूरीमध्ये ५०.९ टक्केच प्रमाण असते. यामुळे हे वाण शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहे.