Saturday, January 28, 2023
HomeAgriculture Newsशेतकरी बंधूनो.. यंदा राज्यातील कांदा उत्पादन आणि बाजारभावाचे काय असेल समीकरण?

शेतकरी बंधूनो.. यंदा राज्यातील कांदा उत्पादन आणि बाजारभावाचे काय असेल समीकरण?

किसानवाणी : सध्या कांद्याच्या बाजारभावात हंगामाच्या सुरवातीलाच सुधारणा दिसत आहे. बाजारसमित्यांमध्ये सध्या कांद्याला ३ हजार रूपये प्रतिक्विंटल हा सरासरी दर मिळत आहे. पंरतु गेल्या जुन – जुलै महिन्यातील कांद्याच्या दराचा विचार करता हा दर तसा कमीच असल्याचे दिसत आहे. 

यंदा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील कांदा दराची काय स्थिती राहिल?
सध्या देशामध्ये दिवाळीपर्यंत पुरेल इतका कांद्याचा साठा शिल्लक आहे. दिवाळी ते संक्रात या कालावधीत जो नवा माल येणे अपेक्षित होते तो आलेला नसल्याने बाजाराने सध्या वरच्या दिशेने वाटचाल सुरू केलीय. सध्याच्या पाऊसमानाचा विचार करता पुढचे १२ ते १५ आठवडे मागणीच्या तुलनेत बाजारात कांद्याचा पुरवठा कमी राहणार आहे. त्यामुळे पुरवठा तुटीमुळे कांदा बाजारभाव तेजीत राहणार आहेत. 

खरीपातील कांदा तुटीची प्रमुख कारणे – 
ऑक्टोबर ते डिसेंबर हा खरीप कांद्याचा हंगाम मानला जातो. या कालावधीत खरीप कांद्याची आवक सुरू होते. मुख्य खरीपात कर्नाटकातील चित्रदुर्ग, बागलकोट, आंध्रप्रदेशातील कर्नुल, मध्यप्रदेशातील खरगोल, खंडवा, निमच, मंदसौर तर राजस्थातील अलवर आणि महाराष्ट्र ही प्रमुख कांदा उत्पादक क्षेत्रे आहेत. देशातील खरीप कांद्याचे क्षेत्र विचारात घेतले तर ते ३ लाख हेक्टर असून यातून ३० लाख टन आवक अपेक्षित असते. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत टप्प्याटप्याने ही आवक बाजारात येते. परंतु सध्या ही आवक सध्या कमी असून कांद्यावरील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि काढणीच्या टप्प्यात झालेला अति पाऊस ही प्रमुख कारणे आहेत.

https://amzn.to/30iel3L

मुख्य खरीपाच्या रोपवाटिका आणि पुर्नलागणी या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाल्या आहेत. प्रमुख खरीप कांदा उत्पादक क्षेत्रात हा प्रादुर्भाव झाल्याने ७० ते ८० टक्के नुकसान झाल्याचे रिपोर्ट येत आहेत. खरीपातील कांद्याची उत्पादकता मुळातच कमी असते, त्यातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने आवकेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे जिथे ३० लाख टन कांद्याची अपेक्षा होती तिथे १० ते १५ लाख टन तरी कांदा उत्पादन होईल का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नवी आवक आणि शिल्लक साठा मिळून ५० लाख टन कांदा बाजारात येणे अपेक्षित असते, परंतु ३२ ते ३५ लाख टनच कांदा उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे. यामुळेच बाजारात आता सुधारणा दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान जो कांदा बाजारात येणे अपेक्षित असते त्याच्या रोपवाटिकांची परिस्थिती देखील खराब असल्याचे चित्र आहे. परिणामी बाजारात दिर्घकालीन तेजी राहण्याचे संकेत मिळत आहेत. 

दसरा ते संक्रात हा काळ कोणत्याही शेतमालाच्या सर्वाधिक खपाचा काळ मानला जातो. परंतु गेल्या तीन वर्षात नेमकं याच काळात येणारं खरीप कांदा उत्पादन फेल होत आहे. अशा प्रसंगी निर्यातबंदी, स्टॉक लिमिट, आयात असे प्रयत्न केले जातात तरी देखील भारतातील प्रचंड मागणीच्या तुलनेत हे प्रयत्न फोल ठरतात. आयात कांदा चव, वास, रंग, आकार या कोणत्याच बाबतीत भारतीयांच्या पसंतीस उतरत नाही. अशा वेळी अनेकदा नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याचा उल्लेख केला जातो. परंतु नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याचा विचार करता तो खूपच कमी आहे. नाफेडने यंदा फक्त २ लाख टन कांदा खरेदी केला होता. यातून २० टक्के घट वजा करता हा कांदा भारताची केवळ ३ ते ४ दिवसाचीच गरज पूर्ण करू शकतो. त्यामुळे नाफेडच्या कांद्यामुळे दर कोसऴतील हे म्हणणे देखील चुकीचे आहे. जिथे ३ आठवड्यांची तुट आहे ती ३ दिवसाच्या पुरवठ्याने भरून निघणार नाही. 

ऑक्टोबर ते डिसेंबर या ९० दिवसात दैनंदिन ५५ ते ६० हजार टन कांद्याची गरज असते, परंतु सध्याची आवक पाहता ३८ ते ४० हजार टनाचा पुरवठा होतोय. परतीचा पाऊस वाढल्यास यात आणखी घट होऊ शकते. भारतात जेव्हा शॉर्टेज होते तेव्हा बाहेरील देशात देखील शॉर्टेज होते. कारण भारत हा दक्षिण आशियासाठी प्रमुख कांदा निर्यातदार आहे. त्य़ामुळे भारतात जर किमंती वाढल्या तर संपूर्ण दक्षिण आशिया आणि आखाती देशात टप्प्याटप्याने कांदा दरात वाढ होते.   

शेजारील बांगलादेशचा विचार करता ढाक्यामध्ये किरकोळ बाजारात सध्या ६५ ते ७५ टक्के कांद्याचे दर वाढलेले आहेत. आठवड्यापूर्वी ४५ ते ५५ टक्के दर होते. बांगलादेशाची कांद्याची वार्षिक गरज २४ ते २८ लाख टन आहे. त्यातील ४० टक्के कांदा त्यांना आयात करावा लागतो. आणि यामध्ये भारतातील कांदा आयातीचा मोठा वाटा आहे. याबरोबरच नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया तसेच आखाती देश हे भारतीय कांद्याचे प्रमुख ग्राहक देश आहेत. 

सध्या खरीप आणि उन्हाळ कांद्याचा बिघडणारा समतोल याचा विचार करता, सध्या मर रोगाच्या भितीने कांदा उत्पादक कांद्याच्या लागणी लेट करत आहेत. महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर पासून टप्प्याटप्याने गावठी किंवा उन्हाळ कांद्याचे बी फोकायला सुरवात होते. उन्हाळ हंगामात महाराष्ट्रातील क्षेत्र ५ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडेल असे चित्र सध्या आहे. देशाच्या उन्हाळ कांद्याच्या उत्पादनाचा विचार करता हा वाटा ५० टक्के आहे. तर देशातील एकूण उन्हाळ कांद्याचे क्षेत्र ११ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडेल असे दिसत आहे. 

पूर्वी देशात ६० टक्के उन्हाळ आणि ४० टक्के खरीप असे कांदा उत्पादनाचे गणित होते. परंतु सध्याचे चित्र पाहता ८० टक्के उन्हाळ आणि २० टक्के खरीप असे प्रमाण झालेले आहे. त्यामुळे येत्या काळात वर्षभर उन्हाळ कांद्याची उपलब्धता राहील अशी शक्यता अधिक आहे. दरवर्षी लागणीचे क्षेत्र वाढत आहे परंतु दुसरीकडे दर हेक्टरी उत्पादकता मात्र घटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोगराई, वाढता उत्पादन खर्च, शिल्लक साठ्यातील घटीचे प्रमाण याचा विचार करून उन्हाळ कांद्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. 

संदर्भ – दिपक चव्हाण, शेती अभ्यासक (यांचे विश्लेषण)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments