Homeयोजनायांत्रिकीकरण योजनेची ऑनलाईन लॉटरी; कागदपत्रे अपलोडिंगला अडचण आल्यास 'या' ठिकाणी करा तक्रार

यांत्रिकीकरण योजनेची ऑनलाईन लॉटरी; कागदपत्रे अपलोडिंगला अडचण आल्यास ‘या’ ठिकाणी करा तक्रार

किसानवाणी : कृषी विभागाच्या विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे.

कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लॉटरीत नंबर लागलेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर पुन्हा जावे लागेल. याठिकाणी अत्यावश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. हे काम गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रातूनही करता येईल. अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावरील सूचना शेतकऱ्यांना कळविल्या जातील.

शेतकरी योजनांचा लाभ घेण्यासाठी ११ जानेवारीअखेरपर्यंत अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज लॉटरीसाठी गृहीत धरण्यात आले होते. लॉटरी प्रक्रिया आता समाप्त झाली आहे. पहिल्या टप्प्यात लॉटरी कृषी यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॉस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन विषयक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

अशी कळेल लॉटरीची निवड
https://mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर जावे. याठिकाणी ’शेतकरी योजना’ यावर क्लिक करा. त्यानंतर वापरकर्ता आयडीवर क्लिक करा. वापरकर्ता आयडी व पासवर्ड व त्याखाली प्रतिमेत दर्शविलेले शब्द भरुन ‘लॉग इन करा’ यावर क्लिक करा. प्रोफाईल स्थिती पृष्ठावर मुख्य मेनुमधील मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर अप्लाइड घटकमध्ये ‘छाननी अंतर्गत अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा. तेथे अर्जाची स्थिती दिसेल. यात Upload Document Under Scrutiny असा शेरा ज्या घटकासमोर असेल त्या घटकासाठी लॉटरीद्वारे आपली निवड झाली आहे, असे समजावे.

अशी अपलोड करा कागदपत्रे
Upload Document Under Scrutiny  असा शेरा ज्या घटकासमोर आहे तेथे लॉटरीसाठी निवड झाल्याचे कळल्यावर, वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर क्लिक करावे. तेथे स्क्रिनवरील ‘कागदपत्र अपलोड करा’ या पर्यायावर क्लिक करा. कागदपत्र अपलोड करा या पर्यायावर क्लिक करताच अपलोडिंगचा स्क्रिन दिसेल. त्यात नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करताना ती १५ केबी ते ५०० केबी या आकारमानातच ठेवावी. अपलोडिंग पूर्ण होण्यासाठी  जतन करा या पर्यायावर क्लिक करा.

मदत केंद्र
ऑनलाईन लॉटरीची पद्धत ही पारदर्शक व जलद झालेली आहे. यात कोणतीही मानवी हस्तक्षेप झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कागदत्रे अपलोडिंग करताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर संपर्क करता येईल. तसेच मदत कक्षात देखील ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे कृषी आयुक्तालयाने नमुद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments