पंजाबराव डख यांचा रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ‘हा’ महत्वाचा सल्ला..

किसानवाणी : यावर्षी पंजाबराव डख पाटील यांनी वर्तवलेले हवामानाचे अंदाज अचूक ठरल्याचे पहायला मिळाले. त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी सतर्क राहिले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान देखील टळले.

दिवाळीच्या दरम्यान देखील पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर डख यांनी आता जो अंदाज वर्तवला आहे तो शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. डख यानी वर्तवलेल्या अंदाजानुसार ८ नोव्हेंबर पासून हवामान कोरडे राहणार असून या दरम्यान शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी पोषक वातावरण राहणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये रब्बी हंगामाच्या पेरण्या करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

खरीप हंगामातील दिर्घ काळ लांबलेल्या पावसामुळे रब्बीचा हंगाम तब्बल एका महिन्यानी लांबणीवर पडला आहे. तसेच दिवाळी मध्ये ही पाऊस पडल्याने  शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली होती. परंतु आता हवामान कोरडे राहणार आहे, त्यामुळे वाफसा आलेल्या शेतात पेरणी करण्याची ही चांगली वेळ असल्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिला आहे.

पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला
आठ नोव्हेंबर पासून कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे रखडलेल्या मागण्यांसाठी हे योग्य वातावरण आहे. १२ नोव्हेंबर पर्यंत असेच कोरडे वातावरण राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळ वाया न घालवता पेरण्यांची कामे सुरू करणे आवश्यक आहे. तर सोमवारपासून पाच दिवस वातावरण कोरडे राहणार आहे मात्र त्यानंतर पुन्हा चक्रीवादळाचा धोका कायम आहे. या वर्षी प्रत्येक दहा ते पंधरा दिवसांनी चक्रीवादळाचा धोका राहणार असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कामे उरकणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नये
दरवर्षी शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणीला सुरुवात करतात. मात्र यावर्षी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रासायनिक खतांची मिसळण किंवा जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करावी. यामुळे हरभऱ्याला मर रोगाचा धोका कमी होईल, त्याशिवाय या वर्षी जास्त पाऊस झाल्याने जमिनीत पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.