PM Kisan योजनेचा हप्ता मोदींनी स्वतःच्या खात्यातून ट्रान्सफर केलाय का..? बातम्यांची हेडींग वाचून उपस्थित होतोय प्रश्न!

किसानवाणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधल्यानंतर देशभरातील बॅंकानी PM Kisan योजनेचा ९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलाय. मोदींनी व्हीडीओ कॉन्फरंसिंग दरम्यान आभासी पद्धतीने याची औपचारिकता पार पाडली. त्यानंतर नवव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली.

दरम्यान, निधी वितरणाच्या बाबतीत अनेक माध्यमानी हेडलाईन मॅनेजमेंट केल्याची टीका आता देशभरातून होऊ लागलीय. अनेक माध्यमांनी दिलेल्या हेडलाईन्स वाचून अनेकांनी, मोदींनी त्यांच्या व्यक्तिगत बँक खात्यातून पैसे जमा केलेत का? असा प्रश्न उपस्थित केलाय. अनेक माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले अशा आशयाचे हेडिंग दिले आहे.

फेब्रुवारी २०१९ मधील अर्थसंकल्पातील घोषणेनुसार मार्च २०१९ पासून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. किसान सन्मान निधीचा नववा हप्ता जमा करण्यापूर्वी या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ११ कोटी शेतकऱ्यांना १.३७ लाख कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलीय.

दरम्यान PM Kisan योजनेच्या निधी वितरणाच्या बातम्यांबाबत अनेक माध्यमांनी हेडलाईन मॅनेजमेंट केल्याचे समोर आलयं. माध्यमांच्या या हेडलाईन मॅनेजमेंट मुळे यावर देशभरातून संतापजनक प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत. अनेक पत्रकारांनी आणि नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून अशा स्वरूपाच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलयं.