Saturday, January 28, 2023
HomeGovt. schemeपीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का? काय...

पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता मिळणार का? काय आहे सत्य?

किसानवाणी : पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 हजार ऐवजी तब्बल 5 हजार रुपयांचा हप्ता मिळणार, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याशिवाय सोशल मीडियावरही याबाबतचे मेसेज व्हायरल होत असल्याचे पहायला मिळत आहे. पण यामध्ये खरचं तथ्य आहे का याची माहिती जाणून घेणं गरजेचे आहे.

PM Kisan सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली आहे. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे 3 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पण, गेल्या काही दिवसांपासून आता 2 नव्हे तर 5 हजार रुपये मिळणार, असे मेसेजेस आणि बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत.

याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही PM Kisan योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली. यामध्ये आम्हाला काय आढळले ते वाचा.. pmkisan.gov.in या वेबसाईटवर या योजनेची माहिती सांगताना स्पष्ट करण्यात आले आहे की, “Under the scheme an income support of 6,000/- per year in three equal installments will be provided to all land holding farmer families.” याचा अर्थ या योजनेअंतर्गत दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये इतकं आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना केलं जाणार आहे. या वेबसाईटवर कुठेही 2 हजारां ऐवजी 5 हजार रुपये हप्ता देण्याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाहीये.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी देखील संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, “पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजारांऐवजी 5 हजारांचा हप्ता दिला जाईल, असं काही आमच्या कानावर आलेलं नाहीये. उलट बँकांच्या आयएफसी कोड संदर्भातील काही बाबींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर याबाबत कार्यवाही करावी, असं आम्ही केंद्र सरकारला सांगितलं आहे.”

पीएम किसान योजनेशी संबंधित अडचणी दूर करण्याचं काम स्थानिक पातळीवर तलाठी कर्मचारी करत असतात. अशा काही तलाठी कर्मचाऱ्यांशीही बीबीसी मराठीने संपर्क साधला. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, “पीएम किसान योजनेअंतर्गत 2 हजार रुपयांऐवजी 5 हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार असल्याचे कोणतेही निर्देश शासनाकडून मिळालेले नाहीत.” त्यामुळे पीएम किसान योजनेअंतर्गत 5 हजार रुपये हप्ता मिळेल, असा जो समज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे, तो चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 नऊ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दहावा हप्ता डिसेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 62 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तुम्ही शेतकरी असूनही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर तुम्ही तुमच्या फोनवरून ऑनलाईन अर्ज करू शकता.

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • एक – या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments