PM Kisan : योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

किसानवाणी :
पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलय. त्यासाठी गुरुवार पासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे कृषीमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना ठरली आहे. या योजनेचा लाभ देशातील अनेक शेतकरी घेत आहेत. योजनेच्या माध्यमातून देशातील १० कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ अद्याप बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महाराष्ट्रात देखील असे अनेक शेतकरी असल्याने लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या योजनेंतर्गत राज्यातील ९८ लाख ५९ हजार ९६७ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात ६९४९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.

राज्यात १ कोटी ५२ लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ४ लाख १४ हजार ५५१ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्रुटी असलेल्या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दुरुस्तीसाठी करण्यात यावी यासाठी २३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहिम राबवून माहितीतील त्रुटी दूर करून नविन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

या कालावधीत सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी महसुल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. १ एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर २४४१ कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली असल्याचेही भुसे यांनी सांगितले.