‘या’ कारणामुळे रखडला पीएम किसान योजनेचा हप्ता!

किसानवाणी :
केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा यंदाच्या आर्थिक वर्षातील तिसरा हप्ता रखडला आहे. या योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरवातीच्या १० ते १५ दिवसांत जमा केले जातात. यंदाच्या आर्थिक वर्षातील मागील दोन्ही हप्ते एप्रिल आणि ऑगस्टमध्ये शेतक-यांच्या खात्यात टाकले गेले. तर तिसरा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जमा होणे अपेक्षित होते. परंतु डिसेंबरचा पहिला पंधरवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीएम किसान योजनेचा तिसरा हप्ता जमा झालेला नाही.

केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतक-यांच्या खात्यात जमा केले होते. यामुळे शेतक-यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. कृषि मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, ९ कोटी शेतक-यांच्या खात्यात या वेळचा ६००० रुपयांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. मात्र, आम्हाला वरून आदेश यायचा आहे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. हा पैसा एकरकमी टाकायचा आहे की टप्प्याटप्प्याने याबाबत सूचना येणार आहे.

अधिका-याने सांगितले की, ‘शेतकरी आंदोलनामुळे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत’. पीएम-किसान योजनेचे पैसे देण्यास होणा-या विलंबाला हे देखील एक कारण असू शकते, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मागील वर्षी देखील शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये दिला जाणारा हप्ता जानेवारी मध्ये वितरित केला गेला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या समारंभाचे आयोजन करून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यात यंदाचा तिसरा हप्ता आला नसल्याने शेतकऱ्यांनी वेळीच आपल्या खात्याचे स्टेटस् (Beneficiary Status) तपासून घेणे गरजेचे आहे. कारण देशभरातील अनेक शेतकऱ्यांची खाती काही गैरप्रकारांमुळे पीएम किसान योजनेतून वगळण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक चुका झालेल्या शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अशा चुका दुरूस्त केल्यास पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे मिळू शकतात.