पोल्ट्री व्यवसाय : पावसाळ्यात ‘या’ नियोजनामुळे मिळेल चांगला नफा

किसानवाणी | देशातील अनेक शेतकरी कुक्कुटपालन हा जोडधंदा म्हणून न करता प्रमुख व्यवसाय म्हणून करण्याला प्राधान्य देत आहेत. या व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगली आर्थिक कमाई देखील होत आहे. परंतु बऱ्याचदा काही पोल्ट्री धारक पोल्ट्री उभारली की तिच्या नियोजनाकडे फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. यामुळे नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी आणि उत्पन्नासाठी आपल्याला पक्ष्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते.

जसे उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारच्या उपाय योजना करुन कुक्कुटपालन करावे लागते तसेच पावसाळ्यातही वातावरणातील बदलानुसार पोल्ट्रीचे व्यवस्थापन करावे लागते. आता पावसाळा चालू झाला असून पावसाळ्यातील आजारांच्या बाबतीत अधिक दक्ष राहावे लागते. पावसाळ्यात कोंबड्यांना संसर्गजन्य आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. अशावेळी कोंबड्यांच्या आहाराकडे, पिण्याच्या पाण्याकडे, वातावरणातील बदलाकडे, तापमानाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.

  1. पावसाळ्यात कोंबड्यांचे तापमान व्यवस्थित ठेवण्यासाठी हीटरचा उपयोग करणे अतिशय गरजेचे आहे. लहान पक्ष्यांना हीटरची उष्णता चांगली वाटते, कारण लहान असल्यामुळे ते त्यांच्या शरिरातील तापमान नियंत्रित करु शकत नाहीत. हीटरमुळे त्यांचे तापमान व्यवस्थित राहण्यास मदत होते. याबरोबरच अंडी उत्पादनासाठीही हीटर फायदेशिर ठरतो.
  2. थंड वातावरणात कोंबड्यांना अधिक भूक लागते. अशावेळी आहाराची कमतरता पडू शकते. तसेच आहार व्यवस्थापन बदलल्यामुळे उत्पादन खर्चात अनावश्यक वाढ होते, आणि परिणामी नफ्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आहार संतुलित ठेवण्यासाठी आणि आपल्याकडे असल्याला आहाराचा साठा योग्य प्रमाणात पुरेल यासाठी कोंबड्यांच्या खाद्यामध्ये तेल किंवा वसा मिसळावा. जेणेकरून खाद्य जास्त लागत नाही, यामुळे शेतकऱ्यांचा किंवा पोल्ट्री मालकाचा अधिक खर्च होत नाही.
  3. पावसाळ्याच्या दिवसात कोंबड्यांना दिले जाणारे पाणी स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केलेले असावे, कारण सर्वाधिक रोग हे पाण्यामुळेच होत असतात. जर पावसाचे पाणी त्यांच्या पिण्यात आले तर त्यांना आजार लागण्याची शक्यता असते. कारण पावसाचे स्वच्छ नसते. यामुळे  त्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी डी- वॉर्मर्स फायदेकारक असते.
  4. कोंबड्यांचे शेड कोरडे ठेवण्यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून शेड  कोरडे राहिल्याने कोंबड्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होईल.
  5. लसीकरण  – पावसाळ्याच्या दिवसात कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे कोंबड्या सहजपणे संक्रमित होत असतात. या वातवरणात डास आणि इतर रक्त पिणाऱ्या किड्यांमुळेही कोंबड्यांना आजार जडतात. त्यामुळे वेळोवेळी लसीकरण करून घेणे अतिशय गरजेचे आहे.