शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारनेही दिले ८९९ कोटी

किसानवाणी : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून यामुळे त्यांच्या आनंदात नक्कीच भर पडणार आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र शासनाने विमा अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी ८९९ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे अखेर वर्ग केले आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

खरीप हंगाम २०२१ मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला तोंड द्यावे लागले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने ९७३ कोटी रुपयांचा राज्य अनुदान हप्ता विमा कंपन्यांना दिलेला होता. मात्र पुढील प्रक्रिया रखडली होती. ही समस्या सोडविण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. तसेच कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आपापल्या पातळीवर गेल्या काही दिवसांपासून विविध यंत्रणांकडे पत्रव्यवहार केले होते. 

‘‘राज्य शासनाने स्वतःचा विमा अनुदान हिस्सा यापूर्वीच जमा केला होता. त्यानंतर कंपन्यांनी केंद्राकडे अनुदान मागणी करणे आवश्‍यक होते. त्यात दिरंगाई सुरू असल्याचे पाहून कृषी विभागाने कंपन्यांकडेही जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्राकडे कंपन्यांनी अखेर अनुदान मागणी नोंदविली. ही नोंदणी पूर्ण होताच केंद्रानेदेखील अनुदान हिस्सा वर्ग केला आहे. परिणामी, पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ अशी माहिती राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली. 

दरम्यान, राज्यभरात खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पूर्वसूचनांची संख्या आता ३४.५२ लाख झाली आहे. यातील ८.०४ लाख शेतकऱ्यांच्या दाव्यांचे प्रस्ताव आतापर्यंत मान्य करण्यात आलेले आहे. या दाव्यांपोटी शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून किमान ४०३ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात वाटले जाण्याची शक्यता आहे. याबाबत कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांची बैठक बोलावून पुन्हा आढावा घेतला. दिरंगाई न करता शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईचा लाभ देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिलेल्या आहेत.

या कंपन्यांना मिळाला अनुदान हप्ता (आकडे रुपयांमध्ये)

रिलायन्स १६५.५८ कोटी 

इफ्को १६१.९९ कोटी 

एचडीएफसी ११६.२० कोटी 

भारती एक्सा ९२.२४ कोटी 

बजाज अलायन्स १०७.६२ कोटी 

भारतीय कृषी विमा कंपनी २५४.९२ कोटी