खुद्द पंतप्रधान मोंदीनी घेतली ‘या’ युवा शेतकऱ्याच्या मोत्याच्या शेतीची दखल

किसानवाणी :
दिवसेंदिवस तरूणांचा शेती व्यवसायाकडे बघण्याचा कल बदलत असून अनेकजण शेती व्यवसायाकडे वळत आहेत. परंतु हा तरूण वर्ग पारंपारिक शेती करण्यापेक्षा प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून नवनवीन शेतीशी निगडीत व्यावसायिक कौशल्य अाजमावत आहेत. उत्तरप्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील नारायणपूर एका युवा शेतकऱ्याने असाच वेगळा प्रयोग केला असून त्याचे पंतप्रधान मोदी यांनी देखील कौतुक केले आहे.

श्वेतांक पाठक, असे या युवा शेतकऱ्याचे नाव असून त्याचे बी.एड पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षणानंतर शेतीशी निगडीत करिअर करण्याचा निर्णय घेतलेल्या श्वेतांकने पारंपारिक शेतीला फाटा देत गोड्या पाण्यातील शिंपला संगोपनातून मोत्यांची शेती सुरू केली आहे. यातून त्यांनी चांगली प्रगती केली असून या मोत्याच्या शेतीच्या माध्यमातून त्यांनी इतरांनाही चांगला रोजगार मिळवून दिला आहे.

श्वेतांकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेतून नोकरी ऐवजी शेती करण्याची प्रेरणा मिळालीय. परंतु श्वेतांकच्या मते शेतकऱ्याचे उत्पन्न केवळ दुप्पट नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वाढवता येणे शक्य आहे. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे असल्याचे श्वेतांकचे मत आहे. आणि याच विचारातून मग मोत्याच्या शेतीची ग्राम समितीच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून याविषयीची संपूर्ण माहिती करून घेतली. आणि नोकरीऐवजी मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. श्वेतांकच्या या कामात त्याला त्याचे आणखी दोन मित्रांचीही साथ लाभली आहे. 

श्वेतांकने, ग्रामसमितीच्या मार्गदर्शनाखाली घराशेजारी एक तळे तयार केले. आणि यामध्ये नदीतून आणलेले शिंपले ठेवले जातात. वर्षभर त्यांचे संगोपन करून आवश्यक त्याप्रकारच्या मोत्यांसाठी शिंपल्यात छोटीसी सर्जरी करून मोती मिळवले जातात. यासाठी वर्षभराचा कालावधी लागतो. श्वेतांकच्या सध्या कल्चर्ड मोत्याची लागवड करीत आहे. जे १२ ते १३ महिन्यांत तयार होतात. हे मोती बाजारात येण्यापूर्वी पॉलिश केले जातात.

श्वेतांकच्या मते, मोत्याची शेती करण्यासाठी फारशा भांडवलाची गरज नाही. अगदी ५० हजार रूपयांच्या भांडवलात या शेतीची सुरवात करता येते. १० बाय १२ ची जमीन यासाठी पुरेशी आहे. फक्त शिंपल्याची चांगली माहिती असल्यास अधिक फायदा होतो. श्वेतांकने उत्पादित केलेल्या मोत्यांची किंमत ही ९० रूपयांपासून २०० रुपयांपर्यंत आहे. यातून त्याला चांगला फायदाही मिळतो आहे. 

बाजारात तीन प्रकारचे मोती – 
बाजारात उपलब्ध असणारे मोती तीन प्रकारचे असतात. एक म्हणजे कृत्रिम मोती, दुसरे नैसर्गिक मोती (समुद्रामध्ये तयार केलेले) आणि तिसरे कल्चर्ड मोती. श्वेतांक करत असलेले मोती हे कल्चर्ड मोतीआहेत. या मोत्यांना आपल्या गरजेनुसार आकार देता येतो. मोत्याच्या शेतीसाठी श्वेतांकने ओडिसा येथील संस्थेत प्रशिक्षण देखील घेतले आहे.