शासनाच्या कृषि सिंचन योजनांचा लाभ घेऊन करा समृध्द शेती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत अनुदान

किसानवाणी :
शेती व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी आणि आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळावे यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी ‘या’ ठिकाणी करा अर्ज 
http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php  या ई-ठिबक  वेबसाईटवर जाऊन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
१. शेतकऱ्याच्या नावे मालकी हक्काचा 8 अ आणि 7/12 असावा
२. सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी, व त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर असावी. नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र द्यावे.
इतर साधनांद्वारे सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्यांनी सादर करावे.
३. सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबंधीतांचे करारपत्र द्यावे.
४. विद्युत पंपाकरिता कायम स्वरूपी विद्युत जोडणी असावी, त्यापुष्ठर्थ मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत सादर करावी.
५. सोलरपंपाची व्यवस्था असल्यास सोलार पंप बसवुन घेतल्याबाबतचे पत्र व सोलार पंपाबाबतची कागदपत्रे शेतकऱ्यांनी प्रस्तावाबाबत द्यावे.
६. शेतकऱ्यांकडे स्वत:चे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.
७. एखादा लाभधारक योजनेत सहभागी होणेस पात्र आहे. मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही अशा लाभधारकांना आधार क्र. प्राप्त होईपर्यंत आधार नोंदणी पावती/मतदार ओळखपत्र/ रेशनकार्ड/ पासपोर्ट / पॅनकार्ड /किसान फोटोकार्ड/ मनरेगा कार्ड /बॅंक पोस्ट आफीस पासबुक  शासकीय कर्मचारी असल्यास ओळखपत्र यापैकी पुरावा सादर केल्यास योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा लाभ घेणेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती
अ. नोंदणीकरीता – आधारकार्ड
ब. अनुदान प्रस्तावाकरीता –
१. शेतक-याने केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत
२. पुर्वसंमती पत्र
३. 7/12 उतारा (मालकी हक्कासाठी)
४. 8-अ उतारा ( एकुण क्षेत्राच्या माहितीसाठी) 
५. आधारकार्ड सत्यप्रत
६. आधारलिंक्ड राष्ट्रीयकृत बॅंक खात्याच्या पासबुकची सत्यप्रत
७. कंपनी प्रतिनिधीने तयार केलेला सुक्ष्म सिंचन आराखडा व प्रमाणपत्र आणि भौगोलिक स्थानांकन पद्धतीने लाभार्थी नोंदणी संदर्भातील शेतकरी/शेतकरी प्रतिनिधी समवेत संचाचे अंक्षांश/रेखांशसह फोटोची प्रत
८. बिलाची मुळ प्रत (टॅक्स ईन्वहाॅईस)
९. शेतक-याचे हमीपत्र

पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत किती अनुदान देय आहे?अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी यांना 55 टक्के आणि इतर शेतकरी यांना 45 टक्के अनुदान देय आहे. 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत किती अनुदान देय आहे?
०९ जुलै, २०१९ च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार,  विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यांमधील सर्व तालुके तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुके अशा राज्यातील एकूण २४४ तालुक्यांमध्ये ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वा तुषार सिंचन संच बसविण्याकरिता प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना देय असलेल्या ५५ टक्के अनुदानास २५ टक्के पूरक अनुदान देऊन एकूण ८० टक्के अनुदान देण्यात येत आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना कमाल ५ हेक्टर क्षेत्रासाठी देय ४५ टक्के अनुदानास ३० टक्के पूरक अनुदान देऊन ७५ टक्के अनुदान देण्यात येत आहे.

पात्र शेतकऱ्यास किती क्षेत्र मर्यादेत लाभ मिळु शकतो?
पात्र शेतकऱ्यास 5 हे. क्षेत्राच्या मर्यादेत लाभ मिळतो. मात्र सन 2014-15 पर्यंत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याच क्षेत्राव लाभ घेतलेल्या तारखेपासून 10 वर्षे अनुदान देय नाही.
तर सन 2015-16 पासून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 7 वर्षांच्या कालावधीसाठी अनुदान देय नाही.

योजनेचा लाभ घेणेसाठी प्रक्रिया कशी आहे?
सर्वप्रथम http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php या वेबसाईटवरील ‘शेतकरी’ या ठिकाणी जाऊन लाभार्थी नोंदणीमध्ये आधारकार्डव्दारे नोंदणी करावी. त्यानंतर वेबसाईटवरील मुख्य पानावरच्या ‘शेतकरी’ याठिकाणी दिलेले वर्ष निवडावे आणि आधार नंबर हा लॉगइन आयडी, आणि योग्य तो पासवर्ड टाकून अर्ज सादर करावा. 

नोंदणी करताना मुख्यत्वे कोणती माहिती भरणे आवश्यक आहे?
अ. स्वत:चे नाव व पत्ता (बॅंक पासबुक व आधारकार्ड वर दर्शविलेप्रमाणे)
आ. आधारकार्ड अपलोड करणे व क्रमांक नोंदणे.
इ. बॅंक खाते क्र. व बॅंक शाखा
ई. मोबाईल क्रमांक- नोंदणी झालेनंतर लाभार्थी क्रमांक संदेशाद्वारे मोबाईलवर उपलब्ध होतो. लाभार्थ्यांना त्यांचे मोबाईलवरील संदेशाद्वारे अर्ज स्थितीबाबत माहिती उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रीया कशी आहे? त्यासाठी मुख्यत्वे कोणती माहीती भरावी लागणार?
१. ज्या ठिकाणी शेतजमीन आहे आणि ज्याकरीता अर्ज करावायाचा आहे तो जिल्हा, तालुका, गाव 
२. लाभ घेणेकरीता लागवड क्षेत्र, खाते उतारा क्रमांक, पीक, पिकातील अंतर
३. बॅंक खाते क्र, शाखा, जिल्हा, बॅंकेचे नाव (राष्ट्रीयकृत बॅंक फक्त)
४. ज्या उत्पादक कंपनीकडुन संच खरेदी करणार आहे ती कंपनी 
५. “पूर्वसंमती शिवाय सुक्ष्म सिंचन संच बसविल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे” असे स्वयंघोषणा पत्रावर बरोबर मार्क करून अर्ज सादर करणे.
६. शासन निर्देशानुसार अंतिमत: अर्ज सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
७. अर्ज सादर केलेनंतर मोबाईलवर संदेशाद्वारे अर्ज क्र. प्राप्त होतो. ज्याद्वारे अर्ज स्थिती पाहण्यास मदत होते.

लाभार्थी नोंदणी ते लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात अनुदान वर्ग होईपर्यंत विविध कार्यवाहीबाबत माहीती कोठे उपलब्ध होईल
१.लाभार्थी नोंदणी ते बॅंक खात्यात अनुदान वर्ग होईपर्यंत विविध स्थितीबाबत माहीती लाभधारकास मोबाईलवर एसएमएस द्वारे वेळोवेळी कळविणेत येतात.
२.तसेच वेबसाईटचे मुख्य पानावरील “शेतकरी” या भागाची निवड करुन त्यामध्ये अर्जाची स्थिती या बटणवर क्लिक करुन लाभार्थी क्रमांक आणि अर्ज क्र. टाकुन अर्ज स्थिती पाहता येईल.
३.भरलेले अर्ज यावर क्लिक करावे आणि भरलेले सर्व अर्जाची माहिती शेतकऱ्यांना मिळेल.

संच खरेदी कोठुन करावा?
संच कृषि विभागाकडील नोंदणीकृत कंपनी/वितरक यांचेकडुन खरेदी करावा. ई ठिबक आज्ञावलीचे मुख्य पानावर ‘नोंदणीकृत वितरक/उत्पादक कंपनी‘ यांची यादी प्रदर्शित केली आहे.