सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राजू शेट्टींची ‘ही’ कळकळीची विनंती

किसानवाणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करत सोयाबीन विकण्याची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे आवाहन केले असून येत्या काळात सोयाबीनचे दर ८५०० रूपये प्रतिक्विंटलच्या पुढे जाणार असल्याची शक्यताही वर्तवली आहे.

काय केलीयं राजू शेट्टींनी सोयाबीन उत्पादकांना विनंती..

माझी कळकळीची विनंती !!
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जवळपास ११ हजार रूपये क्विंटलने बाजारात विकला जाणारा सोयाबिन ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शिवारातील सोयाबिन बाजारात येऊ लागला त्यावेळेस ४००० ते ४५०० रूपयापर्यंत खाली आला. आर्थिक दृष्टचक्रात सापडलेला शेतकरी हा कोसळलेला दर पाहून पुन्हा एकदा हतबल झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ५ नोव्हेंबर पासून मराठवाडा व पश्चिम विदर्भात जनजागृती मेळाव्यासह, विविध आंदोलने, उपोषण करून सरकारच्या धोरणाविरोधात मोर्चे काढण्यात आले. सरकारचे धोरण व व्यापाऱ्यांच्या संगनमतामुळे कवडीमोल दराने विकला जाणारा सोयाबिन न विकण्याचे आवाहन या जनजागृती सभा व मोर्चामध्ये करण्यात आले. वीस दिवसातच ४ हजार रूपये क्विंटलने विकला जाणाऱ्या सोयाबिनचा दर आज ६ हजार ५०० रूपये वर गेला व तो दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती सोयापेंड आयात थांबविणे , जी. एस. टी रद्द करणे , निर्यात अनुदान वाढविणे यासह विविध मागण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. आपण आपला सोयाबिन न विकतां अजून थोड दिवस थांबल्यास निश्चितच हा दर ८५०० रूपयाच्या पुढे जाईल. अवघ्या वीस दिवसात क्विंटल पाठीमागे जवळपास २ ते २५०० हजार रूपये जादा दर राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना आज मिळू लागला हे स्वाभिमानीच्या अथक प्रयत्नामुळे झालेल्या जनजागृतीचा विजय आहे.