नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार ५० हजारांचे सानुग्रह अनुदान

किसानवाणी : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली होती. परंतु घोषणा होऊन बराच कालावधी उलटून गेला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात एक रूपयाही जमा झाला नाही. परंतु आता राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. 

पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, ‘‘थकीत कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला होता. त्या सोबतच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. हा निधी देण्यास अनेक कारणांमुळे विलंब झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होत होता. आता लवकरच सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपये कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. 

याबरोबरच पटोले यांनी, राज्यात महापूर आणि पावसाने निर्माण झालेल्या आपत्तीमुळे पीकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. राज्य सरकारने या पीकनुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सरकारने धान उत्पादकांना सातशे रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. यातील अर्धी रक्कम धान उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम देखील लवकरच जमा होईल अशी माहिती दिली.