७२ तासात ‘या’ ठिकाणी द्या पीक नुकसानीची माहिती, अन्यथा पीक विम्यापासून रहावे लागेल वंचित

किसानवाणी :
गेल्या दोन दिवसात राज्यात झालेल्या जोरदार पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही सध्या जोरदार पाऊस सुरू असून काढणीला आलेली पिके खराब होत आहेत. दरम्यान राज्य शासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. वाशीमच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ७२ तासात माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे.

पावसामुळे शेतात काढून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने नुकसान झाले असेल आणि शेतकऱ्यांनी त्याचा विमा काढला असेल तर नुकसान भरपाई मिळणार आहे. वाशीम जिल्ह्यात सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे. सोयाबीन काढल्यानंतर ते सुकवण्यासाठी शेतात वाळत ठेवले जाते. परंतु असे वाळवण्यास ठेवलेले सोयाबीन अचानक आलेल्या पावसाने भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा सोयाबीनला काढणीपश्चात नुकसान भरपाई अंतर्गत पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळू शकते. असे जिल्हा अधिक्षक अधिकारी यांनी सांगितले आहे. 

  • ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असेल, अशांनी गूगल प्लेस्टोर CORP INSURANCE हे अॅप डाऊनलोड करून आपल्या नुकसानीची माहिती द्यावी. किंवा 18001024088/ 18003004088 या टोल फ्री क्रमांकावर किंवा rgcil.pmfby@relinceada.com या मेलवर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करुन कळवावे. अधिक माहितीसाठी ८२००१६०६२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्राखाली येणाऱ्या शेतात जर वाळवण्यासाठी ठेवला असेल आणि याच दरम्यान १४ दिवसाच्या आत जर पाऊस, आकस्मिक गारपीट,चक्रीवादळ यामुळे खराब झाले तर वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून नुकसान भरपाईस ग्राह्य धरले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती विमा कंपनीला व कृषी विभागाला ७२ तासाच्या आत पुरवणे बंधनकारक आहे. ही माहिती पुरवताना सर्वे नंबर खूप महत्वाचा आहे तसेच यासोबत नुकसानग्रस्त जागेचा तपशील देणेही महत्वाचे आहे. मिळालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करेल आणि पुढील कार्यवाही केली जाईल. 

यामध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि संबंधित शेतकरी याचा समावेश असेल. पाहणीनंतर १० दिवसाच्या आत हा अहवाल सादर करण्यात येईल. संबंधित कुठल्याही  प्रकारची  तक्रार किंवा संबंधित काही अडचण आल्यास ८२००१६०६२५ क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी दिली आहे.