पुरामुळे पिकांचं नुकसान झालयं? मग घरबसल्या ‘या’ठिकाणी नोंदवा पीक नुकसानीची माहिती आणि मिळवा नुकसान भरपाई

किसानवाणी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्याच्या घटना सतत घडतात. पण विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती दिली नाही, या एकाच कारणामुळे अनेक शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. परंतु आता अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांच्या ‘पंतप्रधान पीक विमा’ योजनेसाठी (prime minister crop insurance scheme) खास अॅप विकसित केले आहे. याला ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ असे नाव दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे. राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्‍चित मुदतीत देता येणार आहे.

  • ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ डाऊनलोड करण्यासाठी ‘Crop Insurance App’ या लाल अक्षरांवर क्लिक करा.
  • पंतप्रधान पीक विमा योजने बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ या लाल अक्षरांवर क्लिक करा.

खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु या नियोजित कालावधीत अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती देऊ शकत नव्हते. विमा कंपन्या नेमका याचाच फायदा उठवून पात्र शेतकऱ्यांचेही विम्याचे प्रस्ताव नाकारत असल्याचे दिसून आले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई केवळ तांत्रिक कारणाने मिळत नव्हती. परिणामी शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबले जात. यावर तोडगा काढण्यासाठी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा विमा मिळण्यासाठी केंद्र सरकारने हे अॅप विकसित केले असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी दिली आहे.

दरम्यान, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, अतिवृष्टी, पूरस्थितीने पिकाचे नुकसान, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणाऱ्या आगीमुळे पिकाचे नुकसान इत्यादी विविध बाबींमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळते.