सोयाबीन बाजारभाव आणि वायदे बाजारातील चढउतार काय सांगत आहेत?

किसानवाणी : सोयाबीन वायदे बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात चढ उतार दिसून येत आहेत. २९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबरच्या वायदेबाजारात ही चढ उतार दिसून आलीय. सोमवारी आणि मंगळवारी सोयाबीनच्या दरात मोठी घट झाली. या दोन दिवसात सोयाबीनचे वायदे बाजार ६७०० रूपयांवरून ७०० रूपयांनी घसरले. डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या तीनही महिन्यातील वायदे बाजारावर याचा परिणाम दिसून आला. या तिनही महिन्यातील वायदे बाजारात घसरण झाली.

बुधवार पासून शुक्रवार पर्यंत सातत्याने सोयाबीनच्या वायदे बाजारात सुधारणा दिसून आली. दोन दिवस दर दबावात राहिल्यानंतर त्यात सुधारणा होत असल्याचे पहायला मिळाले. ६००० रूपयांवर आलेल्या सोयाबीनच्या वायद्यानी ६६०० रूपयांची पातळी गाठली आहे. वायदेबाजारात झालेल्या चढ उताराचा परिणाम हजर बाजारातही झाला आहे.

राज्याच्या वेगवेगळ्या बाजारसमितीत आठवड्याच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात घट झाली होती. सरकारी आकडेवारीनुसार लातूर बाजारसमितीत ६५०० रूपये प्रतिक्विंटल दर होते. परंतु मंगळवारी या दरात जवळपास २०० रूपयांची घट झाली. त्यानंतर बुधवारपासून पुन्हा सोयाबीनने ६५०० रूपयांचा टप्पा ओलांडला.

सोयाबीनच्या वायद्यातील चढ उतार हा सोयापेंड आयातीच्या बातम्यांमुळे झाल्याचे पहायला मिळाले. सोयाबीन अर्थात डीओसीच्या आयातीला परवानगी द्यावी यासाठी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी विदेश व्यापार महासंचालक अमित यादव यांना पत्र लिहिलं होत. पोल्ट्री उद्योगाची ५.५ लाख टन सोयापेंड आयातीसाठी मुदतवाढीची मागणी आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी केलेल्या या मागणीमुळे देशभरातील सगळ्या घटकांकडून विरोध झाला. प्रक्रिया उद्योगाने देखील सोयापेंड आयातीला विरोध केलाय. देशातील सोयापेंडीची मागणी आणि पुरवठा बघता सध्या सोयापेंड आयात करण्याची गरज नसल्याचे सोयाबीन प्रोसेसर असोशिएशन ऑफ इंडिया अर्थात ‘सोपा’ने सांगितले आहे.

शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन मिळेल त्या भावात विकाव असा आग्रह पोल्ट्री उद्योग क्षेत्रातून होतोय. हा आग्रह चुकीचा असल्याचे शेतकरी उत्पादक कंपनी असोशिएशनने म्हणटल आहे.

Kisanwani: