Homeबातमी शेतीचीयेत्या काळात सोयाबीनचे दर कितीपर्यंत टिकून राहतील? जाणून घ्या सविस्तर

येत्या काळात सोयाबीनचे दर कितीपर्यंत टिकून राहतील? जाणून घ्या सविस्तर

किसानवाणी : सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात आवक  वाढत आहे. मात्र वाढलेली मागणी पावसाने पिकाला बसलेला फटका यामुळे सोयाबीनचे दर सध्यातरी साडेपाच हजारापर्यंत टिकून आहेत. देशातील महत्वाच्या बाजारसमित्यांमध्ये  एफएक्यूच्या सोयाबीनला ४३०० ते ५४५० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान मिळत असल्याचे चित्र आहे. 

यंदा महाराष्ट्रात सोयाबीनची लागवड वाढली असली तरी पेरणीला झालेला उशीर, सुरवातीला पावसाने दिलेली ओढ आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीने झालेले नुकसान यामुळे उत्पादकता घटली आहे. त्यातच बियाणांच्या कमतरतेमुळे मध्यप्रदेशात लागवडीला फटका बसला. त्यामुळे सहाजिकच उत्पादनात घट होत आहे. विविध संस्थानी सोयाबीनचे उत्पादन चांगले होण्याचे अंदाज वर्तवले असले तरी सध्या आपण विचारात घेतलेली परिस्थिती आणि मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील स्थिती पाहता उत्पादनात घट होणार हे निश्चित आहे.

वायदे बाजारात नोव्हेंबरच्या डिलिव्हरीचे सौदे ५३०० तर डिसेंबरचे सौदे ५४५० रूपयांनी झाले आहेत. सोयाबीन तेलाचे दरही वाढले असून प्रतिदहा किलोमागे ७५ रूपये वाढ झाली आहे. १२५० रूपये प्रति दहा किलोचे दर सध्या १३२५ रूपये झाले आहेत. वायदे बाजार आणि तेलाच्या दरातील वाढीमुळे बाजारसमित्यांमध्ये तेलाच्या दराला मजबूती मिळत आहे.  

येत्या काळात देशभरातील बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक १० ते १२ लाख पोत्यांवर जाण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात ६ ते ७ लाख पोती, महाराष्ट्रात २ लाख ७५ हजार ते ३ लाख पोती, राज्यस्थानात ५० हजार पोती तर इतर राज्यात ५० हजार पोती आवक होण्याचा अंदाज आहे. 

येत्या काळातील पाऊसमान आणि पिक काढणीला होत असलेला उशीर यामुळे बाजारातली आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच आहे. त्यातच शिल्लक साठाही नसल्याने प्रक्रिया उद्योगाकडूनही नवीन सोयाबीनला मागणी आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीने सोयाबीनच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याने एफएक्यूच्या सोयाबीनला मागणी आहे. 

मध्यप्रदेशातील सोयाबीन व्यापारी तरूण जैन यांच्या म्हणण्यानुसार राज्यात २५३ बाजारसमित्या आहेत. सुरवातीला दर तेजीत होते. त्यानंतरच्या काळात मात्र केंद्र सरकारच्या आयात शुल्क कपातीच्या निर्णयाने आणि १२ लाख टन डीओसीच्या (पशुखाद्य)  आयातीने दर ३८०० ते ५४०० रूपयांपर्यंत खाली आले. दरातील अनिश्चितता आणि पावसाने पीक खराब होण्याचे प्रमाण यामुळे शेतकरी ताबडतोब माल विक्री करत आहेत. 

युएसडीएच्या मते भारतात यंदा पामतेलाची ८५ लाख टन, मोहरी तेलाची ३० लाख टन, सोयाबीन तेल ५३.५० लाख टन, सूर्यफूल तेल २६.५० लाख टन, सरकी तेल १४ लाख टन, शेंगदाणा तेल ११.५० लाख टन, तसेच इतर खाद्य तेलाची ६.२० लाख टन आवश्यकता असेल. ही वाढलेली मागणी येत्या काळातील सोयाबीनच्या दराला पूरक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूणच सोयाबीनचे दर येत्या काळात किमान ४००० ते कमाल ६००० रूपयांपर्यंत राहतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments