सोयाबीन उत्पादकांनो दर पडले म्हणून लगेच विक्री करू नका; कारण येत्या काळात…

किसानवाणी : सध्या सोयाबीन बाजार भावासंदर्भात उलट – सूलट चर्चा सुरू आहेत, त्याविषयी धुळे येथील ओमश्री. अग्रोटेक कंपनीचे संचालक सचिन अग्रवाल यांनी कळवलयं की,
1. आंतरराष्ट्रीय बाजारात नॉन जी.एम.ओ – ऑरगॅनिक अशा व्हॅल्यू अॅडेड सेगमेंटमध्ये भारतीय सोया डीओसीला जोरदार मागणी आहे. जर्मनी,जपानसह विकसित देशांची ऑरगॅनिक डीओसीची भूक फार मोठी आहे. आणि सध्या मालाचा तुटवडा आहे. म्हणून,भारतीय सोयाबीन प्रोसेसर्स व निर्यातदार हे मार्केट डिक्टेट करू शकतील एवढी निगोशिएशन / वाटाघाटी करण्याची क्षमता बाळगून आहेत…आणि या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांना पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल रेट मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे पॅनिक सेलिंग करू नये, असे आवाहनही स्वत: प्रोसेसर व डीओसी एक्स्पोर्टर असलेल्या सचिन अग्रवाल यांनी केले आहे.

2. आज अशा काही बातम्या आल्या, सोयाबीनचा भाव दहा हजारावरून तीन हजारावर… परंतु प्रत्यक्षात अशी वस्तूस्थिती नाही. इंदूर बाजारात आज सोयाबीनला 6565/- रुपये प्रतिक्विंटल रेट मिळाला आहे. आणि इंदूर बाजार हा सोयाबीन साठी देशातला बेचमार्क म्हणजे स्टॅंडर्ड बाजार आहे. म्हणून आपला क्वॉलिटी माल विकण्यापूर्वी इंदूर बाजारातील रोजचा रेट पाहून घ्यावा. त्यानुसारच सोयाबीन विकावे. इंदूरचा रेट हा एनसीडीईएक्स वेबसाईटवरील मार्केट डाटा विंडोमध्ये स्पॉट रेट लिंकला क्लिक करून शनिवार-रविवारचा अपवाद वगळता दररोज पाहता येतो, किंवा इंदूरच्या व्यापारी मित्रांना फोन करूनही भाव काढता येतो.

3. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनच्या (सोपा) रिपोर्टनुसार आज अखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातले सोयाबीनचे पीक चांगले आहे. पण, म्हणून उत्पादनात फार मोठी वाढ होईल असे दिसत नाही. याचे उदाहरण म्हणून अमेरिकेच्या कृषी खात्याने (युएसडीए) भारतीय सोयाबीनविषयी जो सर्व्हे केलाय, त्यात 108 लाख टन उत्पादनाचे अनुमान दिले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त 4 लाख टनाने जास्त आहे. इथे 4 लाख टनांनी उत्पादन वाढतांना दिसत असले तरी त्यापेक्षा खपवाढीचे प्रमाण अधिक आहे, हे सर्वांत महत्त्वाचे. उदा. यु.एस.डी.ए.च्याच रिपोर्टमध्ये ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या मार्केटिंग वर्षासाठी भारताच्या सोया डीओसीची वार्षिक मागणी ही 62 लाख टनावरून 70 लाख टनापर्यंत वाढवली आहे. म्हणजे युएसडीएने 4 लाख टनाने उत्पादनाचा आकडा वाढवला हे खरेय ,पण देशांतर्गत खपात 8 लाख टनाने वाढ दाखवली आहे. म्हणजे उत्पादनवाढीपेक्षा खपवाढीचा वेग अधिक आहे आणि निर्यातीच्या मजबूत मागणीचाही आधार आहे. (डीओसी आयातीच्या 12 लाख टन मंजूर कोट्यापैकी 8 लाख टन आयातीचे सौदे झाले आहेत. आयात होतेय, पण त्याचवेळी निर्यातही सुरू राहणार आहे. येत्या हंगाम वर्षात 17 लाख टन निर्यातीचे अनुमान युएसडीएने दिले आहे.)

किसानवाणीचे युट्यूब चॅनल नक्की पहा आणि सबस्क्राईब देखील करा..!

इथे आपण तीन संदर्भ पाहिले आहेत. प्रोसेसर्स व एक्स्पोर्टचे म्हणणे पाहिले. प्रत्यक्ष स्पॉट रेट किती हे हे पडताळून पाहिले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पीक चांगले असले तरी बाजारातील मागणी सुद्धा तेवढीच जोमदार आहे, म्हणून, खूप घाबरून जाऊन इंदूर बाजाराच्या वास्तव रेटच्या तुलनेत कमी रेटने विकू नये, आणि इंदूरच्या रेटचा पडताळा पाहून निर्णय घ्यावा, हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

दीपक चव्हाण,
कृषी अभ्यासक,
पुणे