सोयाबीनचे दर १० हजार प्रतिक्विंटल होणार? सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

किसानवाणी : राज्यसरकारने घेतलेल्या एका निर्णयाने बाजारातील सोयाबीनचे दर वाढण्यास मदत झाली आहे. राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावण्यास केंद्राला नकार दिल्याने त्याची बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे. राज्यातील बाजार समित्यांत बुधवारच्या तुलनेत शनिवारपर्यंत दरात सुधारणा झाली होती. सरकारच्या या निर्णयाने व्यापारी, स्टॉकिस्ट, आणि प्रक्रियादारांसह शेतकऱ्यांनाही लाभ होईल, असे जाणकारांनी सांगितले. तर बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात ५० ते २५० रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

सध्या देशातील काही बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे दर ८५०० रूपयांवर देखील पोहचल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात यात आणखी वाढ होऊन दर १० हजार पार जातील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन घाई घाईने न विकता टप्प्या टप्प्याने विक्री करण्याचे आवाहन जाणकारांकडून करण्यात येत आहे.

देशांतर्गत बाजारातील वाढत्या खाद्यतेल दरामुळे केंद्र सरकार चिंतेत होते. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारांनी खाद्यतेल आणि तेलबियांवर स्टॉक लिमिट लागू करण्याची सूचना ८ ऑक्टोबरला दिली होती. एरवी केंद्र सरकारच स्टॉक लिमिट ठरवून राज्यांना अंमलबजावणी करण्यास सांगत असते. मात्र यावेळी राज्यानाच मर्यादा ठरविण्याचे अधिकार दिले होते. महाराष्ट्र सरकारने मिळालेल्या अधिकारानुसार स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करता येईल, आणि याचा लाभ सोयाबीन दरवाढीसाठी होईल.

सरकारने बुधवारी निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन दरात ५० ते २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रक्रिया प्लांट्स त्यांच्या गरजेप्रमाणे खरेदी करतात. मात्र मोठे व्यापारी, स्टॉकिस्ट, स्पेक्युलेटर्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आतापर्यंत खरेदीपासून दूर होत्या. आता मात्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने हे स्टेकहोल्डर्स बाजारात उतरण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनमध्ये तेजी असल्याने स्टॉकिस्ट खरेदीत कमीच उतरत आहेत मात्र दराला आधार मिळत आहे. 


राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील दराचा आढावा घेतल्यास दरवाढ झाल्याचे स्पष्ट होते. बुधवारी कारंजा बाजार समितीत सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार १०० रुपये दर होता, तो शनिवारी ६ हजार २०० रुपयांवर पोचला. लातूर बाजार समितीत बुधवारी सरासरी दर ६ हजार ७०० रुपये दर होता, तो शुक्रवारी ६ हजार ९०० रुपयांवर पोचला. तर वाशीम बाजारात सोयाबीनचा दर सहा हजारांवरून ६ हजार ३०० रुपयांवर स्थिरावला. मानवत बाजार समितीतही दरात १०० रुपयांची सुधारणा होत ६ हजार रुपयांवरून ६ हजार २०० रुपयांवर पोचला. 


सोयाबीनवर साठा मर्यादा न लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशनेही अशी घोषणा केल्यास बाजाराला मोठा आधार मिळेल. सध्या सोयाबीनचा बाजार वाढला आहे. स्टॉक लिमिटच्या भीतीने मोठे स्टॉकिस्ट, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी साठा केलाच नव्हता. आता सरकारने साठा मर्यादा लावणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरवाढीला मदत होईल. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट यांनाही याचा लाभ मिळणार आहे.

– दिनेश सोमानी – शेतीमाल बाजार विश्लेषक