लंडनमधली १० लाखांची नोकरी सोडून ‘हे’ जोडपं गावी करतयं शेती; यूट्यूबवरही झालयं फेमस..!

किसानवाणी :
चांगली नोकरी करून कुटूंबाचे पालनपोषण करणे हे अनेकांचे किंबहुना प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु काहीजण यालाही अपवाद आहेत. चांगली नोकरी सोडून त्यांना खेडेगावात रमायला आणि शेती करायला आवडते. गुजरातमधील बारन गावातील एका जोडप्याने असाच प्रवास केला असून परदेशातील नोकरी सोडून त्यांनी गावी शेती करण्यास सुरवात केलीय. आज त्यांना शेतीतून चांगली कमाई देखील होतेय. परंतु त्यांचा हा उलटा प्रवास जितका प्रेरणादायी तितकाच संघर्षमय देखील असल्याचे पहायला मिळते. चला तर जाणून घेऊया फॉरेन रिटर्न या शेतकरी दांपत्याविषयी…

पोरबंदर, गुजरातमधील बारन गावचा रामदे खुटी हा तरूण, पत्नी भारती खुटी यांच्यासोबत लंडनमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. दोघांनाही लाखोच्या घरात पगार मिळत होता. परंतु एके दिवशी या दोघांनी गावी जाऊन तिकडेच शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय धक्कादायक असला तरी तो भारतीय तरूणाईसाठी किती प्रेरणादायी आहे हे पुढे वाचल्यानंतर समजून येईल…

रामदे खुटी २००६ साली प्रथम इंग्लंडला गेले. तिथे त्यांना चांगली नोकरी देखील मिळाली. नोकरीच्या दरम्यान २००८ मध्ये त्याने भारती यांच्याशी लग्न केले. त्यावेळी भारती राजकोटमध्ये विमानतळ व्यवस्थापन आणि एअर होस्टेसचा अभ्यास करत होत्या. २०१० मध्ये शिक्षण संपल्यानंतर त्या लंडनला पती रामसोबत राहण्यासाठी गेल्या. तेथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन व आतिथ्य व्यवस्थापन विषयात पदवी संपादन केली. या पदवीनंतर त्यांनी ब्रिटिश एअरवेजच्या हीथ्रो विमानतळावरुन आरोग्य आणि सुरक्षिततेचा कोर्स केला आणि त्यानंतर तेथेच काम करण्यास सुरवात केली. 

लंडनमध्ये चांगली नोकरी आणि लक्झरी आयुष्य जगणाऱ्या या दांपत्याने गावी परतून शेती करण्याचा का निर्णय घेतला हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. मात्र याचे खरे कारण भारतीय संस्कृती आणि एकत्र कुटूंबपध्दतीच्या संस्कारात दडलेले आहे. वास्तविक, इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना रामदे यांना आपल्या आई वडिलांची काळजी कोण घेईल याबाबत चिंता वाटत होती. तसेच त्यांची शेती देखील मजुरांच्या कडून करून घेतली जात होती. आई वडिलांची सेवा करण्याच्या आणि शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने अखेर रामदे आणि भारती यांनी एकमेकांच्या संमतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

भारतात परतल्यानंतर या दांपत्याला सुरवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण शेतीत प्रत्यक्ष राबणे आणि शेती करण्याचा निर्णय घेणे यात खूप फरक होता. तसेच दोघांनीही शेतीत फारसे कधीच कामही केले नव्हते. तरी येणाऱ्या अडचणीतून शिकत रामदे आणि भारतीने नव्याने शेती व पशुपालन करण्याचे काम सुरू केले. पारंपारिक शेती सोडून आधुनिक पद्धतींचा अवलंब केला. कालांतराने दोघेही शेतीत चांगलेच गुंतल्याचे दिसून येते. दूध काढण्यापासून  सर्व कामे भारती स्वतः करतात. 

भारतीने आपल्या ग्रामीण जीवनासंदर्भात, ‘लिव्ह व्हिलेज लाइफ विथ ओम अँड फॅमिली’ नावाचे एक यूट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे, ज्याचे जवऴपास ६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भारती रोजच्या शेतीविषयक कामांची माहिती देते, शेती व पशुसंवर्धनाविषयी महत्वाच्या टिप्स देते. त्यांच्या या व्हिडीओत त्यांच्या संपूर्ण कुटूंबाचे अनेकदा दर्शन होते. तसेच एक छोटा मुलगाही प्रत्येक व्हिडीओमध्ये दिसतो जो या दांपत्याचा लाडका चिरंजीव ‘ओम’ आहे. अशा या रामदे व भारती फॉरेन रिटर्न दांपत्याचा प्रवास सर्वच शेतकरी बंधूसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही. 

* भारती यांचे युट्यूब चॅनेल पाहण्यासाठी Bharati.Ramde या लिंकवर क्लिक करा.