डीएपी खत १२०० रूपयात खरेदी करण्यासाठी आवश्यक आहेत ‘या’ गोष्टी

किसानवाणी : मे महिन्यात केंद्र सरकारने डाय अमोनिया फॉस्फेट म्हणजेच DAP खतावर वाढीव अनुदान जाहीर केले. ५० किलो च्या DAP च्या पोत्यावरील अनुदान ५०० रुपयांवरून १२०० रुपये केले. हे अनुदान पहिल्यापेक्षा ७०० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळं आता अनुदानित DAP खत शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच १२०० रुपयांना मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या दरामुळे खत कंपन्यांनी DAP ची किंमत १७०० रूपयांवरून २४०० रूपयांपर्यंत वाढवली. पूर्वी सरकारकडून डीएपी खतावर ५०० रूपये अनुदान दिले जात होते. त्यामुळे शेतकऱ्यांना डीएपीची एक गोणी १२०० रूपयांना मिळत होती. परंतु नुकतीच खत कंपन्यानी दरवाढ केल्याने शेतकऱ्याना मोठा भुर्दंड सोसावा लागणार होता. या वाढीव दराचा अधिभार केंद्र सरकारने उचलला असून DAP च्या एका पोत्यामागे केंद्र सरकार १२११ रुपये कंपन्यांना अनुदान देणार आहे. DAP खतांच्या अनुदानासाठी केंद्र सरकार १४,७७५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

जाणून घ्या, अनुदानित DAP खत कसे मिळवायचे:
१. DAP खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आधार कार्ड आणि शेतकरी कार्ड ची झेरॉक्स असणे गरजेचे आहे. ही २ कागदपत्रे दिल्यावर DAP खत आपल्याला १२०० रुपयांना मिळणार आहे.
२. या सोबतच प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या अंगठ्याचा ठसा देणे अनिवार्य आहे.