Saturday, January 28, 2023
HomeGovt. schemeनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे काय?

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे काय?

किसानवाणी :
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार होते. कर्जमुक्ती योजनेची घोषणा होऊन एक वर्ष होत आले तरी नियमित कर्जफेड करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या पदरी मात्र अद्याप निराशाच पडल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भात घोषणा केली होती. त्यामुळे राज्य सरकारला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा विसर पडलाय का असा प्रश्न या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.

या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. हे अनुदान एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग वर्ग होणार होते. परंतु अद्याप यातील १ रूपयाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. राज्य शासनाने सप्टेंबर २०१९ अखेरची दोन लाखांपर्यंत थकीत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर एप्रिल २०२० पर्यंत जमा करण्याचे आश्‍वासनही शासनाने दिले होते. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख ७७ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ३०३ कोटी रूपयांची कर्जमाफी मिळाली, तर दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने वन टाइम सेटलमेंट योजना लागू केली. त्यातून दोन हजार शेतकऱ्यांना सव्वीस कोटी १४ लाखांचा लाभ मिळाला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख शेतकरी कर्जमुक्त झाले.

थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असली तरी, नियमित परतफेड करणारे शेतकरी मात्र अनुदानापासून वंचित राहिल्याने त्यांच्यात संतापाची भावना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments