Homeतंत्रज्ञानव्हर्मी वॉश आहे पिकांसाठी खूप फायदेशिर; 'या' सोप्या पध्दतीने बनवा घरच्या घरी!

व्हर्मी वॉश आहे पिकांसाठी खूप फायदेशिर; ‘या’ सोप्या पध्दतीने बनवा घरच्या घरी!

किसानवाणी :
सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळाला फार महत्व आहे. गांडूळापासून व्हर्मी कंपोस्ट आणि व्हर्मी वॉश असे दोन उपयुक्त घटक मिळतात. जे पिकांच्या दृष्टीने अधिक लाभदायक आहेत. व्हर्मी कंपोस्ट हे प्रामुख्याने गांडूळाच्या विष्टेपासून बनते. गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी असून तो जमिनीतील सेंद्रीय पदार्थ खाऊन आपली उपजिविका करतो.

या दरम्यान गांडूळ खालेल्या सेंद्रीय घटकांपैकी आपल्या पोषणासाठी केवळ १० टक्के भाग वापरतो तर उर्वरित भाग विष्टेव्दारे शरीराबाहेर टाकतो. त्यालाच गांडूळखत किंवा व्हर्मी कंपोस्ट असे म्हणटले जाते. व्हर्मी कंपोस्ट बरोबर गांडूळापासून व्हर्मी वॉश देखील मिळवले जाते. जे पिकांना अधिक उपयुक्त असते. कारण व्हर्मी वॉश मध्ये मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि ती पिकांना तात्काळ उपलब्धही होतात. त्यामुळे पिकांची प्रतिकारक्षमता वाढून उत्पादकता ही वाढते. 

व्हर्मी कंपोस्टसाठी तयार केलेल्या बेड मधून व्हर्मी वॉश मिळवणे सहज शक्य होते. परंतु केवळ व्हर्मी वॉश हवे असेल तर त्यासाठी वेगळी पध्दत वापरावी लागते. व्हर्मी वॉश मिळवण्याची ही पध्दत देखील सोपी असून कुणालाही करता येण्यासारखी आहे. व्हर्मी वॉश मिळवण्यासाठी खालील प्रमाणे साहित्य गोळा करून कृती करावी. 

साहित्य – 
१. दोन मातीचे माठ (एक लहान आणि एक मोठ्या आकाराचा)
२. माठ ठेवण्यासाठी एक तिपाई
३. शेणखत (अर्धवट कुजलेले) याबरोबरच उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ (जसे की कुजलेला पालापाचोळा)
४. गिरिपुष्प, लुसर्नघास आणि कडूनिंबाचा कोवळा पाला
५. व्हर्मी वॉश जमा करण्यासाठी एक चिनीमातीचे भांडे किंवा काचेचे भांडे (धातूचे भांडे वापरू नये) 
६. चांगली पोयटा माती आणि आवश्यकतेनुसार पाणी
७. पूर्ण वाढ झालेली निरोगी गांडुळे (१००० किंवा अर्धा किलो)

व्हर्मी वॉश मिळवण्याची पध्दत
१. मोठ्या माठाच्या तळाला बारीक छिद्र पाडून त्यात साध्या कापडाची किंवा कापसाची वात टाकावी. हा माठ तिपाईवर ठेवून त्यानंतर त्याच्या तळाशी जाड वाळू ४ इंचापर्यंत भरावी. 
२. वाळूच्या थरावर अर्धवट कुजलेले शेणखत टाकून त्यावर पाण्याचा हलका फवारा द्यावा. 
३. या ओल्या झालेल्या थरावर पूर्ण वाढ झालेली किमान १००० निरोगी गांडूळे सोडावीत.
४. गांडूळ शेणखत आणि सेंद्रीय घटकांच्या थरावर सोडल्यानंतर गांडूळांना खाद्य म्हणून त्यावर गिरीपुष्प, लुसर्नघास तसेच कडूनिंबाचा कोवळा पाला प्रत्येकी अर्धा किलो शेणस्लरीसह पसरावा. अशा प्रकारे मोठा माठातील कृती पूर्ण करावी. 
५. मोठा माठातील काम पूर्ण झाल्यानंतर छोटा माठ घ्यावा, त्याच्याही तळाला लहान छिद्र पाडून त्यात कापड अथवा कापसाची वात टाकावी, आणि त्यानंतर छोटा माठ मोठ्या माठावर ठेवून त्यात पाणी ओतावे. हे पाणी मोठ्या माठात थेंब थेंब पडत राहते. 
६. तिपाईच्या खाली व्हर्मी वॉश जमा होण्यासाठी चिनीमातीचे अथवा काचेचे भांडे ठेवावे. पहिल्या सात दिवसात तयार झालेले पाणी पुन्हा वरील छोट्या माठात ओतावे. त्यानंतर सात दिवसांनी चिनीमातीच्या भांड्यात जमा होणारे पाणी व्हर्मीवॉश म्हणून पिकांसाठी वापरता येते.

व्हर्मी वॉशमध्ये अस्तित्वात असणारे घटक 

अनु.क्र.पौष्टिक घटकप्रमाण
१.सामू६.८
२.सेंद्रिय कार्बन(%)०.०३
३.नत्र(%)०.००५
४.स्फुरद(%)०.००२५
५.पालाश(%)०.०६३
६.कॅल्शिअम (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)७८६
७.मॅग्नेसिअम (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)३२८
८.गंधक (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)
९.लोह (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)०.१५१
१०.मँगनीज (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)२१३
११.जस्त (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)०.१३२
१२.तांबे (मि.ग्रॅ./कि.ग्रॅ.)०.११७
व्हर्मी वॉशमध्ये अस्तित्वात असणारे घटक 

गांडूळ अर्क पिकासाठी वापरण्याची पध्दत –
व्हर्मीवॉश कोणत्याही पीकांवर फुल अवस्थेत अथवा फळ अवस्थेत वापरता येते. यासाठी ५ लिटर व्हर्मी वॉश १०० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे.

व्हर्मी वॉशचे पिकासाठी फायदे – 
१. गांडूळांच्या त्वचा आणि विष्ठेत पीकवाढीसाठी आवश्यक असणारे सर्व घटक असतात. हे घटक व्हर्मी वॉश मध्ये एकत्र मिळत असल्याने ते पिकांसाठी उपयुक्त ठरतात.
२. व्हर्मी वॉश पिकांच्या फुलोरा व फळपक्वतेच्या अवस्थेत फवारल्याने फुलगळ, फळगळ थांबण्यास मदत होते.
३. व्हर्मी वॉश फवारल्याने पिकांची वाढ जोमदार होऊन पिक तजेलदार आणि रसरशीत दिसते.
४. पिकांची प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे पिकांचे विविध किड आणि रोगांपासून संरक्षण होते.
५. पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होते. परिणामी उत्पन्नही चांगले मिळते. 

 • लेखन – 
 • कु. इंद्रायणी गुणाजी गवस
  ( पदव्युत्तर विद्यार्थिनी,  उद्यानविद्या विभाग, डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विदयापीठ, दापोली, रत्नागिरी)
  Email Id- indrayanigawas14@gmail.com
  संपर्क – +९१ ९४०३७२४०१३
 • प्रा. नितीन काशिनाथ गवळी
  (सहाय्यक प्राध्यापक, फळशास्र विभाग, उद्यानविद्या महाविद्यालय, सरळगाव (ठाणे)
  Email Id- nitingawali664@gmail.com
  संपर्क – +९१ ८३०८३२३४४५

कृषी पत्रकारितेसाठी आम्हाला पाठबळ द्या

आमची कृषी पत्रकारिता समृध्द करण्यासाठी आपले योगदान द्या
प्रिय वाचक, आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्या कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे सहकार्य गरजेचे आहे. आपले सहकार्य आमच्या भविष्यासाठी नक्कीच खूप मोलाचे आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments