अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

किसानवाणी : भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या दि. ८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व सूचनांचे पालन करावे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. आपल्या गावात, परिसरात अतिवृष्टी मुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाह्य मदतीची गरज असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

राज्यात पावसाचा जोर
राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये गेली १७ तास मुसळधार पाऊस कोसळत असून पुन्हा एकदा महापुराची भीती असल्याने आधीच एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम असून गुरूवारपर्यंत हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणेसह कोकण व मराठवाड्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश यांच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.
यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पश्चिम आणि वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे त्याचा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्याटप्प्याने प्रभाव जाणवेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.